अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांनी प्रचाराला वेग आणला आहे. २१ संचालकपदाच्या निवडीसाठी १६८६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. असे असले तरी पॅनल गठनानंतरच उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल, असे चित्र आहे.
संचालकपदाचे स्वप्न उराशी बाळगून १०५ जणांनी नामांकन दाखल केले आहे. एकूण २१ संचालक निवडून जाणार आहेत. यात १४ तालुक्यातून १४ सेवा सहकारी सोसायटीमधून १४ संचालक निवडून जातील. तर ओबीसी, एससी व एसटी, व्हीजेएनटी, सहकारी नागरी बॅक, वैयक्तिक मतदार संघ प्रवर्ग एक तर महिला प्रवर्गातून दोन असे एकूण सात संचालक निवडून जातील. त्याकरिता विविध प्रवर्गासाठी १०५ जणांनी नामांकन सादर केले आहे. मात्र, २१ संचालक आणि १०५ नामांकन अशा स्थितीत दोन पॅनलमध्ये केवळ ४२ उमेदवारांना सामावून घेतले जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना तिसरा पर्याय शोधावा लागेल, असे चित्र आहे. कोणकोणत्या पॅनलमधून उमेदवार निश्चित होईल, त्यानंतरच विजयाचे गणित जुळून येतील, असे सहकारातील जाणकारांचे मत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज, सहकार नेते असले तरी कोणत्या पॅनलमध्ये कोणाला स्थान मिळते, यावरच जय-पराजय ठरणार आहे. किंबहुना उमेदवारांची भाऊगर्दी बघता तिसरे पॅनल तयार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
----------------------
अमरावतीत ५०० पेक्षा जास्त मतदार
जिल्हा बँक निवडणुकीत १६८६ मतदारसंख्या असून, त्यापैकी ५०० पेक्षा जास्त मतदार हे अमरावती शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे सहकार नेते, उमेदवारांनी प्रचाराचा फोकस अमरावतीत केला आहे. ’उमेदवार थेट मतदारांच्या घरी’ या माध्यमातून प्रचाराला वेग आला आहे. आता केवळ भेटीगाठी सुरू असून, २३ सप्टेंबरनंतर उमेदवार चिन्हासह प्रचार करतील, असे दिसून येते. २२ सप्टेंबर ही नामांकन मागे घेण्याची मुदत आहे.