वादळ : अमरावती-दर्यापूर मार्गावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी रात्री ९.३० वाजता वादळी पाऊस झाला. यामध्ये रस्त्यावर झाड पडून कारचा अपघात झाल्याची घटना खारतळेगाव ते खोलापूरदरम्यान घडली. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. रात्री ९ वाजता अंबानगरीत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंगाली काठीचे मोठे झाड दर्यापूर- अमरावती महामार्गावर उन्मळून पडले. दर्यापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक अविनाश ठाकरे या मार्गावरून जात असताना त्यांना सदर झाडाचे खोड दिसलेच नाही. भरधाव कार वळण घेताना झाडाला धडकली. यामध्ये ते व त्यांचा एक मित्र थोडक्यात बचावले. मात्र कारचे मोठे नुकसान झाले. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. वादळात इतर ठिकाणीही झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अमरावती-दर्यापूर, परतवाडा, चांदूरबाजार मार्गावर झांडाच्या बुंध्याला आग लावण्याच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यामुळे अर्धवट जळालेले झाड तसेच राहते. त्यामुळे वादळाच्या झोक्याने ते रस्त्यावर कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे. परंतु झाड पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सकाळी ११ वाजेपर्यंत कुठलीही दखल घेण्यात आली नाही किंवा हा राज्य महामार्ग असतानाही झाड रस्त्यावरून हटविण्यात आले नाही. त्यामुळे जड वाहनांना रस्त्याच्या कडेला जाऊन वाहने काढावी लागली. त्यामुळे जड वाहनांना त्रास सहन करावा लागला.
रस्त्यावर झाड पडल्याने कारचा अपघात
By admin | Published: May 14, 2017 12:07 AM