अमरावती - भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते अमरावतीत सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कटक (२८, रा. सांगली), आकाश कश्यप (२६) व तुषार मुरलीधर भुतडा (२८, रा. साईनगर) अशी जखमींची नावे आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मीडिया सर्व्हिसेसचे काही अधिकारी व कर्मचारी अमरावतीत सर्वेक्षणासाठी आले. ते गडगडेश्वर परिसरातील एका मित्राच्या खोलीवर थांबले होते. शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ते आपली कामे आटोपून कार (एमएच २७ एबी-०००९) ने इर्विन चौकात पोहोचले. त्यांनी चालकास सिगारेट घेण्यासाठी इर्विन चौकातील पानटपरीवर पाठविले. सिगारेट न मिळाल्याचे पाहून चालकास तेथेच सोडून शाहू भोसले याने कारचा ताबा घेत जयस्तंभ चौकाच्या दिशेने भरधाव नेली. जयस्तंभकडून राजकमल चौकाकडे वळण घेत असताना भरधाव कारचा अचानक टायर फुटला आणि कार श्याम चौकातील उड्डानपुलाच्या पिलरला जाऊन आदळली. कार चालविणारा शाहू जागीच ठार झाला, तर सोबतचे चौघेही जखमी झाले. काही अंतरावर असणारे कोतवालीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. कोतवाली पोलिसांनी मृतकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची आ. रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी शनिवारी भेट घेतली.
कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली; एक ठार, चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 7:54 PM