रस्त्याच्या दुतर्फा घाण : आरोग्याला संभवतो धोका चांदूरबाजार : तालुक्यातील शिरजगाव बंड हद्दीतील चांदूरबाजार-माधान रस्त्यावर शेकडो क्विंटल सडलेला संत्रा फेकण्यात आला आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छ भारत मिशनचा सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शासनातर्फे सर्वत्र स्वच्छतेकरिता निरनिराळ्या योजना, सक्तीची कार्यवाही, विशेष सवलती अशा अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे शासनाच्या या योजनांना हरताळ फासत ग्रामपंचायती आपल्या तुघलकी धोरणामुळे शासनाच्या योजनाचा फज्जा उडवीत आहे. तालुक्यातील चांदूरबाजार-माधान रस्त्यावर १०-१२ संत्रा मंडी आहे. या मंडीमधून केरळ, दिल्ली, बेंगलूर, कलकत्तासह संपूर्ण देशभरात पाठविला जातो. त्याकरिता संत्रा बागेतून तोडून आणलेला संत्रा छाटनी करून विक्रीस पाठविला जातो तर छाटनी केलेला निकृष्ट दर्जाचा संत्रा मुख्य रस्त्याच्या दोन्ही कडेला टाकण्यात येतो.हा निकृष्ट दर्जाचा संत्रा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. संत्रा व्यावसायिकांच्या या हलगर्जीपणामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूरबाजारकडे करण्यात आली आहे. मात्र तरीही या सडक्या संत्र्याला रस्त्यावर टाकणाऱ्या संत्रा व्यावसायिकांवर कोणतीच प्रतिबंधित कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासकीय अधिकारीच शासकीय योजनेचा फज्जा उडवीत असल्याचे सिद्ध होत आहे.शासनाकडून हागणदारीमुक्तीकरिता कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये दंडात्मक कारवाईची शिक्षा याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. मात्र रस्त्याच्या कडेला टाकलेल्या सडका संत्र्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीतून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, तर या सततच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने यावर शासनातर्फे कोणतीच काकवाई केली जात नसल्याने पंतप्रधानांचे ‘स्वच्छ भारत मिशन’चा फज्जा उडत आहे. (तालुका प्रतिनिधी)सडलेल्या संत्र्याच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. यासह ही दुर्गंधी पाण्याद्वारे पसरल्यास टायफाईड, हिवतापाची लागण होते. या संत्र्यामुळे डासांचे प्रमाण वाढतात. हे टाळायचे झाल्यास या दुर्गंधीचा नायनाट होणे गरजेचे आहे.- हेमंत रावळे, वैद्यकीय अधिकारी
कुजक्या संत्र्यांच्या दुर्गंधीने नागरिक हैराण
By admin | Published: April 05, 2017 12:11 AM