अमरावती : तब्बल १०० वेळा कॉल करून एका तरूणीचा ऑनलाईन पाठलाग करण्यात आला. ७ मार्चच्या सायंकाळी ७.३३ ते ८ मार्चच्या रात्री ८.०३ मिनिट अशा २५ तासाच्या कालावधीत त्याने त्या तरूणीचे जगणे मुश्किल केले. अखेर तिने ८ मार्च रोजी उशिरा रात्री राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मनोज नामक त्या कॉलिंगपर्सनविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, ७ मार्च रोजी सायंकाळी ती तरूणी घरी अभ्यास करत असताना एका अनोळखी क्रमांकाहून तिला मोबाईल कॉल आला. त्याने त्याची ओळख मनोज सरत अशी दिली. आपण सुरतहून बोलत असल्याची बतावणी त्याने केली. तू माझ्याशी मैत्री कर, मला फोन कर, असे म्हणून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला.
काही कॉल तिने रिसिव्ह केले, मात्र तो ‘तू माझ्याशी मैत्री कर, मला फोन कर’ हेच वाक्य रिपीट करत असल्याने ती गोंधळली. तिने कॉल घेणे बंद केले. मात्र पुढील २४ तासात त्याने तिला अंदाजे १०० वेळा कॉल केले. अखेर कंटाळून तिने ही बाब कुटुंबीयांच्या कानावर घातली. तथा तिला धीर देऊन पोलीस ठाणे गाठले.