अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘फॉल्टी’ उत्तरपत्रिकाप्रकरणी संबंधित कंत्राटदारांना २६ लाखांचा दंड आकारला आहे. रॅण्डम पद्धतीने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी करून दंड वसुलीची कार्यवाही करण्यात आली आहे. तब्बल चार तासांच्या छानणीनंतर या कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाने उन्हाळी व हिवाळी २०२० परीक्षेसाठी ४० लाख उत्तरपत्रिकांचा पुरवठा केला आहे. २४ पानी उत्तरपत्रिका प्रति ३ रुपये २१ पैसे दराने पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, उत्तरपत्रिकांचे देयके अदा करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदारांनी पुरवठा व्यवस्थित केला अथवा नाही, याची उलटतपासणी करण्यात आली. त्यानुसार ४० लाखांपैकी ७ लाख उत्तरपत्रिका ‘फॉल्टी’ ठरविण्यात आल्या आहेत.
उत्तरपत्रिकांच्या पुरवठा दरम्यान निकष, अटी, शर्थीचे पालन झाले अथवा नाही, याचा शोध समिती घेते. त्याअनुषंगाने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी करण्यात आले. रॅण्डम पद्धतीने तपासणी करून १९.८३ टक्के उत्तरपत्रिका ‘फॉल्टी’ ठरविण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित पुरवठादाराच्यासमक्ष गुरूवार, ५ मार्च रोजी पार पडली. उत्तरपत्रिकांचा पुरवठा गुजरातच्या खेड येथील बिंदीया इंटरप्रायजेसने केला आहे. ४० लाख उत्तरपत्रिकांच्या पुरवठ्याचे देयके १ कोटी ३० लाख रुपये एवढे कंत्राटदराने सादर केले होते. मात्र, क्रॉस चेकींगमध्ये उणिवा, त्रुटी आढळल्या असून, उत्तरपत्रिकांमध्ये ‘फॉल्टी’प्रकरणी २६ लाख २६ हजार ८१६ रुपयांच्या दंड वसूल केला जाणार आहे.समितीकडून दंड आकारणी, अहवाल तयारउत्तरपत्रिकांसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे गठित समितीकडून तपासणी करून दंड आकारण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल तयार असून, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, वित्त व लेखाअधिकारी भारत क-हाड, उपकुलसचिव मोनाली वानखडे, दादाराव चव्हाण आदींनी उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज बघितले. उत्तरपत्रिकांची तपासणी रॅण्डम पद्धतीने करण्यात आली. यात ७ लाख उत्तरपत्रिका ‘फॉल्टी’ ठरविण्यात आल्या असून २६ लाख २६ हजार ८१६ रूपये दंड आकारला आहे. ही बाब संबंधित पुरवठादाराने मान्य केली असून, त्याने तसे लेखी दिले आहे. - हेमंत देशमुख, (संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ)