अमरावती: येथील दीक्षा उर्फ सृष्टी सुनिल थोरात या सहा वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी रामपुरी कॅम्प येथील एका बीएचएमएस प्रॅक्टिशनर महिला डॉक्टरविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास तो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दीक्षाच्या नातेवाईकांचा रोष कमी झाला. मात्र त्यानंतरही रात्री ११ च्या सुमारास काही अज्ञातांनी त्या हॉस्पिटलवर दगडफेक केली. मात्र, त्याबाबत डॉक्टरकडून तक्रार नोंदविली गेली नाही.
दरम्यान, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी सकाळी दीक्षाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. तिचा मृतदेह अमरावतीत आणल्यानंतर अत्यंत शोकमय वातावरणात त्या चिमुकलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गौतमनगर येथील सुनिल थोरात यांची मुलगी दीक्षा हिची प्रकृती बिघडल्याने तिला तिच्या कुटुंबियांनी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी रामपुरी कॅम्प स्थित बीएचएमएस डॉक्टर दाम्पत्याच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील महिला डॉक्टरने तिला इंजेक्शन दिले. मात्र तिची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. त्यामुळे दीक्षाला अन्य एका एमडी डॉक्टरांकडे हलविण्यात आले. तेथे १५ ते २० मिनिटातच कुठलिही हालचाल न करता तिने अखेरचा श्वास घेतला.
नातेवाईकांचा आक्रोशदीक्षाच्या मृत्यूला ती महिला डॉक्टर कारणीभूत असल्याने तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीवर नातेवाईक ठाम राहिले. जिल्हा सामान्य रूग्णालयात दीक्षाच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखा निरिक्षक आसाराम चोरमले यांनी इन कॅमेरा शवविच्छेदन व डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिल्यानंतर रोष कमी झाला. रात्री ९ च्या सुमारास दीक्षाच्या एका महिला नातेवाईकाच्या तक्रारीवरून भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गाडगेनगरचे पोलीस निरिक्षक वैभव पानसरे यांनी दिली.
असा आहे महिला डॉक्टरवरील ठपकाआपण दीक्षाला रामपुरी कॅम्प येथील ‘त्या’ मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये नेले. खोकल्याचे तीन इंजेक्शन द्यावे लागतील, असे सांगून तेथील महिला डॉक्टरने दीक्षाला तीन इंजेक्शन दिली. ते लावताच दीक्षाला ओकारी झाली. तथा ती भोवळ येऊन खाली पडली. तेथेच तिने डोळे पांढरे केले. मेडिसिनबाबत पुर्ण ज्ञान नसताना महिला डॉक्टरने दीक्षाला चुकीचे इंजेक्शन दिले. दीक्षाच्या मृ त्युला तीच कारणीभूत ठरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.