अमरावती : चार दिवसांपूर्वी मुख्य वनसंरक्षक यांच्या बंगल्यातून चंदन झाडाची कटरने चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. चोरट्यांनी थेट वनरक्षकांच्या बंगल्यात प्रवेश करुन चंदन झाडांना लक्ष केल्याप्रकरणी वनरक्षक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. या वनरक्षकाचे चोरट्याशी असलेले मधूर संबंध उघडकीस आणण्यासाठी काही पुरावे गोळा केले जात आहेत.जुन्या बायपासलगत असलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यात असलेल्या चंदन झाडांना लक्ष करुन ते चोरण्याची मजल गाठणाऱ्या चोरट्यांपर्यंत पोहचण्यासाठी गाडगेनगर पोलिसांनी विशेष लक्ष पुरवून चौकशी सुरु केली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यातून चोरीस गेलेल्या चंदनाच्या झाडांची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा ‘तो’ वनरक्षक शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. अमरावतीत मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे असून वनविभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन हे तस्कर चंदन झाडांची कत्तल करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येते. बड्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यांना लक्ष करण्यात आल्यामुळे ही चंदन झाडांची चोरी करणारी टोळी जेरबंद करणे पोलिसांसह वनविभागालाही महत्त्वाची झाली आहे. काही वनरक्षकांचे चोरट्यांसोबत असलेले संबंध शोधून काढले जात आहेत. यात काहींचे मोबाईलवरील संवादाचे पुरावे गोळा करणे सुरु आहे. विशेषत: वरुड येथील एक वनरक्षक पोलिसांच्या रडारवर असून या वनरक्षकांने मोबाईलवर आतापर्यंत केलेल्या संवादाची माहिती पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)
चंदन झाडाच्या चोरी प्रकरणी वनरक्षक रडारवर
By admin | Published: November 30, 2014 10:57 PM