परतवाडा (अमरावती) : शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेवर, ''खैर नही खैर नही, गुस्ताखे नबी, अब तेरी खैर नही, गुस्ता के नबी की एक ही सजा, सरतनसे जुदा''. तसेच ''गुस्ताखो के सर काटके रख देंगे मुसलमान'' असे गाणे वारंवार वाजविल्या गेले.
यात ३७ (१)(३) बीपी ॲक्ट व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ व भादवि कलम ५०५ (२) अन्वये परतवाडा पोलिसांनी नऊ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध पोलीस घेत आहे.
पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांनी परतवाडा ठाणेदारांकडे कायदेशीर तक्रार दिल्यानंतर ही कारवाई केल्या गेली. शहरातील महावीर चौकात, शेखपुरा येथील ईद-ए-मिलाद जुलूसचे शेख हासम शेख कादर यांचे नेतृत्वातील ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेवर हे गाणे वाजविल्या गेले. एकाच ठिकाणी वारंवार गाणे वाजवून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करीत दोन समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी शेख हासन शेख कादर यांचेसह आठ अनोळखी इस्मान विरुद्ध हे गुन्हे दाखल केले आहेत. याच अनुषंगाने विश्व हिंदू परिषद आणि भाजपाकडूनही पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
* बॅनर होल्डिंग काढले : गुन्हा दाखल केल्या गेल्यानंतर मंगळवारला परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकासह शहरात इतरत्र लागलेले बॅनर, होल्डिंग, झेंडे युद्ध पातळीवर पोलिसांच्या उपस्थितीत नगरपालिका प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली आहे. यात नगरपालिका प्रवेशद्वारावर आणि नगरपालिकेसमोर लावल्या गेलेले होल्डिंग व पोस्टरसही काढण्यात आले आहेत.