लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : मेळघाटातील जंगल कामगार सहकारी संस्थांच्या सचिवांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रकरण पुढे आले होते. जिल्हा संघाने जारिदा येथील त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सचिवाला निलंबित केल्यानंतर इतर दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यातील तारूबांदा जंगल कामगार सहकारी संस्थेचा सचिव सुदामा एस. मसागोले याला २४ ऑगस्टला निलंबित केले. संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात लोकमतने पूर्वीच वृत्त प्रकाशित केले होते.
तारूबांदा जंगल कामगार सहकारी संस्थेचा सचिव सुदामा एस. मसागोले याने सचिवपदावर असताना केलेले आर्थिक गैरव्यवहारबाबत निलंबनाची मागणी संस्थेचे उपाध्यक्ष व सभासदांनी जिल्हा संघाला तक्रार दिल्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती जिल्हा संघाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, त्याने कोणाबाबतही स्पष्टीकरण, खुलासा सादर केला नाही. याशिवाय कर्तव्यात वारंवार कसूर करीत त्याने संस्थेत केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा अवमान केला. अध्यक्ष रामसिंग जाधव यांनी सुदामा मसागोले याला निलंबित केले. त्याच्या संस्थेचा पदभार भवई संस्थेच्या सचिवाकडे देण्याचे आदेशात म्हटले आहे.
अजून काही रडारवर? मेळघाटातील जंगल कामगार सहकारी संस्थांमध्ये जंगल राज सुरू असल्याची वृत्तमालिकाच लोकमतने गत महिन्यात प्रकाशित केली होती. जिल्हा संघाने तक्रारीवरून चौकशीस आरंभ करण्यासाठी सचिवांना निलंबित केले असले तरी कोट्यवधी रुपयांचा निधी या संस्थांना मिळत असताना लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात संस्थांच्या सचिवांनी केल्याची चर्चा आता पुढे येत आहे.