अमरावती : राज्यात महिला-मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कोणाचा वचक राहिलेला नाही. राज्यात कायद्याचा धाक नसल्यामुळेच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप माजी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
भंडारा, वर्धा, पुणे यासह ठिकठिकाणी महिला व मुलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराचे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून या प्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यशोमती ठाकूर यांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अतिशय बेजबाबदारपणे वागताहेत. राज्याला बेवारस करून सचिवांच्या हातात कारभार देऊन दोघांचीही दिल्लीवारी सुरू आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. त्यांनी महाराष्ट्राला अस्थिर केले असून याची सर्वाधिक झळ ही सर्वसामान्यांना बसत आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३५ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीवर उपचार सुरू आहेत. सोमवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या दोन्ही पीडितांना भेटून प्रकृतीची चौकशी केली. चाकणकर म्हणाल्या, ३५ वर्षीय पीडिता बोलण्याचा स्थितीत नाही. यामुळे तिसरा आरोपी अद्यापही मोकाट आहे. १३ वर्षीय चिमुकली अद्यापही ‘शॉक’मध्ये आहे. अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर ५ वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही घटनाबाबत राज्य महिला आयोग सुमोटो तक्रार दाखल करणार आहे. लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यासह शनिवारी भंडारा प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आपल्या चार-पाच कार्यकर्त्यांसह मेडिकलमध्ये आल्या होत्या. तर, रविवारी शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे, सुषमा अंधारे व प्रवक्त्या संजना घाडी यांनी तिची विचारपूस केली.