लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदार महिला पोलिसासह एका तरुणाच्या बँक खात्यातून रक्कम चोरी गेल्याची आणखी दोन घटना गुरुवारी रात्री समोर आल्यात. सायबर गुन्हेगारांनी दोघांच्याही खात्यातून तब्बल ४३ हजारांची रोख परस्पर काढून घेतली. आतापर्यंत अशाप्रकारे रक्कम काढण्याच्या दहा घटना शहरात घडल्या असून, यामध्ये तब्बल दहा लाखांपर्यंत रक्कम बँक खात्यातून गेली आहे. मात्र, सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचारी शारदा अशोक सोळंके (२७) यांच्या मोबाइलवर गुरुवारी सायंकाळी तीन संदेश प्राप्त झाले. संदेश पाहताच त्यांना धक्काच बसला. त्यांना त्यांच्या खात्यातून ३ हजार, १० हजार व ५ हजारांची रोख विड्रॉल करण्यात आल्याचे आढळून आले. हा प्रकार पाहून त्यांनी तत्काळ कॅम्प स्थित स्टेट बँकेची शाखा गाठली.चौकशी केल्यानंतर त्यांना पोलीस तक्रारीचा सल्ला देण्यात आला. पोटे टाऊनशिप येथील रहिवासी प्रल्हाद रणगिरे यांचा मुलगा अमोल (२८) यांना एटीएममधून १० हजार व ५ हजार रुपये विड्रॉल झाल्याचे संदेश मिळाले. त्यांनीही बँकेत धाव घेऊन चौकशी केली व गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.तपासासाठी पोलीस जाणार दिल्लीलाआतापर्यंत दहा जणांच्या तक्रारीवरून सायबर सेलने तपासकार्य सुरू केले आहे. बॅक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतल्या जाण्याच्या तक्रारी दररोज वाढत असून, त्या अनुषंगाने सायबर सेलकडून दहा एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत स्किमर व छुपा कॅमेरा लावणारे आढळून आले नाहीत. त्यामुळे हा प्रकार काही वेगळा असल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुण्यात घडलेल्या अशाच गुन्ह्याची माहिती पोलिसांनी घेतली होती. मात्र, या घटनेशी काही संबध नसल्याचे आढळून आले आहे. आता दिल्लीतही असेच अनेक गुन्हे घडले असून, त्या अनुषंगाने अमरावती पोलीस तपासकार्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.आतापर्यंत १० एटीएममधील सीसीटीव्हींची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत गुन्हेगार आढळला नाही. विविध बाजूने तपासकार्य सुरू आहे.- कान्होपात्रा बन्सा,पोलीस उपनिरीक्षक
महिला पोलिसाच्या खात्यातूनही रोख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:36 PM
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदार महिला पोलिसासह एका तरुणाच्या बँक खात्यातून रक्कम चोरी गेल्याची आणखी दोन घटना गुरुवारी रात्री समोर आल्यात.
ठळक मुद्देएसबीआय : पुन्हा दोघांना गंडा; खात्यातून ४३ हजार परस्पर काढले