अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी २५ ऑगस्ट २०२३ रोजी औरंगाबाद विभागातील बनावट 'कास्ट व्हॅलिडीटी' धारक तहसीलदार दत्तात्रय बळीराम निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधी नातेवाईक असलेल्या १७ जणांच्या 'कास्ट व्हॅलिडीटी' रद्द केलेल्या आहे. तर उर्वरित ८ जण हे औरंगाबाद समितीच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे त्यांच्यावरही कार्यवाही होण्यासाठी समितीची प्रत त्यांना पाठविण्याचा निर्णय किनवट समितीने घेतलेला आहे. या कारवाईच्या अनुषंगाने राज्यसरकार ॲक्शन मोडवर आल्याने ‘जात चोरी’ करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत.
शिवजीत उत्तम निलावाड याचा 'मन्नेरवारलू' अनुसूचित जमातीचा दावा निकाली काढलेल्या प्रकरणात २५ ऑगस्ट २०२३ रोजी त्याचे जातप्रमाणपत्र रद्द व जप्त करण्यात आले आहे. त्याच आदेशात रक्त नात्यातील या १७ ही जणांच्या 'कास्ट व्हॅलिडीटी' एकाचवेळी रद्द आणि जप्त करण्यात आल्या आहेत. 'त्या' तहसीलदाराच्या नात्यात १३ जणांकडे 'कास्ट व्हॅलिडीटी' या मथळ्याखाली लोकमतने ८ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे राज्यसरकार ॲक्शन मोडवर येऊन अनुसूचित जमाती पडताळणी समितीने एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’ रद्द करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
...अखेर 'त्या' तहसीलदाराची बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द
या धडक कार्यवाहीने राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत बनावट 'कास्ट व्हॅलिडीटी' च्या आधारे बनवेगिरी करुन ‘एसटी’च्या राखीव जागेवर अद्यापही शासकीय सेवेत कायम असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी आता अधिनियम २००० मधील कलम १०,११ व १२ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
कारवाई आणि कार्यवाहीसाठी यांना केले प्राधिकृत
रद्द करण्यात आलेल्या १७ बनावट कास्ट व्हॅलिडीटी धारकांवर कारवाई आणिव कार्यवाहीसाठी मुख्याध्यापक श्री. शिवाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय माणिकनगर नांदेड, प्राचार्य सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय पावडेवाडी, नांदेड. कोषागार कार्यालय उस्मानाबाद, प्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, सौ.के.एस.ए. महाविद्यालय बीड, प्राचार्य शिवछत्रपती काॅलेज एन -३ सिडको औरंगाबाद, सहनिबंधक वर्ग -१ कार्यालय, व्हिआयपी रोड नांदेड, म.रा.वि.म. शहागंज उपविभाग औरंगाबाद, नगर परिषद बीड, प्राचार्य चंद्रभानु सोनवणे काॅलेज लातूर, प्राचार्य एम.आय.टी. ज्युनिअर पौड रोड पुणे, प्राचार्य देवगिरी काॅलेज औरंगाबाद, तहसीलदार कंधार, जालना, परळी, खुलताबाद, नांदेड यांना आदेशित व प्राधिकृत केले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी (महसूल) कंधार यांनी आदेश मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत सर्व वैधताधारक यांची मुळ वैधता प्रमाणपत्रे व जातप्रमाणपत्रे जप्त करुन किनवट कार्यालयास जमा करण्याचे आदेशित केले आहे.
औरंगाबाद महसूली विभागात विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या नामसादृष्याचा फायदा घेऊन बनावट जातप्रमाणपत्रे, त्याआधारे पडताळणी समितीचे बनावट आदेश, न्यायालयाचे बनावट निर्णय तयार करणे आदी आरोपासंबंधी सखोल तपासणीसाठी शासनाने 'एसआयटी' स्थापन केली होती. तो अहवाल ३० नोव्हेंबर २०१८ रोजी शासनास सादर झालेला आहे. परंतु अद्यापही या अहवालावर शासनाने कार्यवाही केली नाही.
- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.