चिखलदरा : तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील विद्यार्थी आणि इतर नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सर्वत्र ऑनलाईन सुविधा शासनाने नागरिकांसाठी केली तरी मेळघाटात हा सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे.
धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी व विद्यार्थी तीन महिन्यांपासून जात प्रमाणपत्रासाठी वाट पाहत आहेत. अमरावती जिल्हा ई-डिस्ट्रिक्ट झाला. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट आणि शासकीय कामासाठी लागणारा वेळ वाचावा, यासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असे जवळपास शालेय कामासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध व्हावे, हाच त्याचा उदात्त हेतु होता. परंतु, मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील विद्यार्थ्यांंना धारणी उपविभागीय कार्यालयातून मिळणारे जात प्रमाणपत्र मागील तीन महिन्यांपासून बंद झाले.
सेतु केंद्राकडे आवश्यक सर्व कागदपत्रे विद्यार्थी व नागरिकांनी दिली. तेथूनही कागदपत्रे तपासणी झाल्यावर संबंधित दोन्ही तहसील कार्यालयात पाठविण्यात आले व तेथून धारणी एसडीएम कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी पाठवली गेली. सर्व ऑनलाईन पद्धतीने पाठवल्यावरसुद्धा जात प्रमाणपत्र न आल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
बॉक्स
एक अधिकारी, दोन ठिकाणी कारभारी
धारणी प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी पदावर सहायक जिल्हाधिकारी असलेले वैभव वाघमारे यांची नियुक्ती दोन महिन्यांपूर्वी झाली. आदिवासींना तात्काळ सुविधा मिळाव्या, यासाठी साधनांवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. परंतु, पंधरा वर्षापासून एक अधिकारी अन् दोन ठिकाणचा कारभारी हाच नियम मेळघाटात सुरू आहे. प्रमाणपत्राअभावी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-------------------़कोट येत आहे.