अमरावती : परस्परस्नेहाचा भाव वृद्धिंगत करणारा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत सुरू राहणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. तरीदेखील सायंकाळच्या वेळी महिला वर्ग घोळक्याने जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मकर संक्रातीचे वाण कदाचित कोरोनाचे दान तर ठरणार नाही, अशी आशंका व्यक्त केली जात आहे.
घराबाहेर वावरताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन वारंवार करते. मात्र, नागरिक याविषयी फारशी काळजी करताना दिसत नाहीत. बहुतांश नागरिकांच्या चेहऱ्याला मास्क नाहीत. कुठेही फिजिकल डिस्टन्स नाही. आता १६ तारखेपासून लसीकरणाला प्रारंभ झालेला असला तरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजून कमी झालेला नाही. त्यामुळेच नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यातील मकर संक्रातीचा सण आला. नात्यातील गोडवा वाढविण्यासाठीचे तीळ-गूळ आणि त्यानिमित्त हळदी-कुंकू व वाण देण्याचा कार्यक्रम घरोघरी होत आहे. सामूहिक कार्यक्रम यंदा जवळजवळ नाहीच, ही महत्त्वाची बाब आहे. मात्र, यानिमित्त घरोघरी असणाऱ्या हळदी-कुंकवाचे कार्यक्रमातदेखील महिला वर्गाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करणे आता काळाची गरज आहे.
बॉक्स
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही आवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी आवश्यक आहे.
बॉक्स
कोरोना पसरतोय
दिनांक पाॅझिटिव्ह मृत्यू
२० जानेवारी ४१ ०ृ१
२१ जानेवारी ९० ००
२२ जानेवारी ७१ ०१
२३ जानेवारी ६३ ००