दर्यापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने पेरणीकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन पंचायत समितीचा कृषी विभाग व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.
अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बनावट भेसळयुक्त बियाणांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्के पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर पूर्णं तपशील जसे की पीक, वाण, पूर्ण लॉट क्रमांक, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, रोख किंवा उधारी पावती इत्यादी तपशील तपासावा. खरेदी केलेल्या बियाणे वेष्टन/ पिशवी, टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामात शिफारस केल्याची खात्री करावी, भेसळाची शंका दूर करण्यासाठी बियाणे पाकिटे सीलबंद / मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावर अंतिम मुदत तपासावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा. शेतकऱ्याने बियाणे तक्रार करावयाची असल्यास पेरणीपासून १० दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीत विहित नमुन्यात तक्रार दाखल करून सोबत ७/१२, आधार कार्ड, बिलाची झेरॉक्स, टॅगची झेरॉक्स जोडावी. तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावी व खरेदी पक्के बिल, टॅग, रिकामी पिशवी व बियाणे बॅगमधील थोडे बियाणे इत्यादी पीक चांगले येईपर्यंत जपून ठेवावे. इत्यादी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे राजकुमार अडगोकर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी उद्धव भायेकर यांनी केले आहे.