आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी खा. आनंदराव अडसूळ आणि सीपी दत्तात्रय मंडलिक उपस्थित होते.पोलीस आयुक्तालयात ना. पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेतला. पोलीस कार्यशैलीतील कमकुवत दुवा हेरून क्षुल्लकशी वाटणारी एखादी तक्रार संबंधित व्यक्तीच्या जीवन-मरणाशी निगडित असू शकते. त्यामुळे तक्रार कुठलीही असो, ती गांभीर्याने घ्या, असे आदेश त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिलेत. छोटी घटना मोठे स्वरूप घेऊ नये, यासाठी प्रत्येक प्रकरणाच्या मुळाशी जाऊन नेमके कारण शोधून काढा. वेळीच आरोपीवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून तक्रारकर्त्याला दिलासा द्या. लोकाभिमुख पोलिसिंग करा, असे निर्देश त्यांनी दिले.अमरावतीत भरदिवसा घडलेले प्रतीक्षा मेहेत्रे हत्याप्रकरण आणि अल्पवयीन तरुणीच्या चेहºयावर उकळते तेल फेकण्याच्या प्रकरणाने पोलीस प्रशासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी ई-चलान तसेच वाहतूक नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पोलीस कारवाईचा लेखाजोखा तपासाताना ना. पाटील यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांच्या कामकाजावर नापंसती दर्शविली.वाढत्या लोकसंख्येला आवश्यक सुरक्षा पुरविण्याच्या दृष्टीने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस वसाहत, पोलिसांच्या कुटुंबीयांशी निगडित प्रश्न या समस्यादेखील लवकरच सोडविल्या जातील, असे ना. पाटील म्हणाले.तेल की अॅसिड ? प्रयोगशाळेचा अहवाल मिळवाशिवटेकडीनजीक एका मुलीच्या अंगावर फेकलेला तरल पदार्थ नेमका कोणता होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी रासायनिक विश्लेषण करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी पोलिसांना दिले.वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजीना. रणजित पाटील यांनी आढावा बैठकीत वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वाहतूक व्यवस्थेसाठी दीडशेपेक्षा अधिक वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत असल्याची दप्तरी नोंद आहे. मात्र फिल्डवर वाहतूक पोलीस दिसत नसल्याच्या लोकतक्रारी त्यांनी पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्या.
१५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:20 AM
शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
ठळक मुद्देरणजित पाटील : क्षुल्लक तक्रारही गांभीर्याने घ्या