आॅनलाईन लोकमतअमरावती : एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदिस्त झालेला आरोपीचा चेहरा, त्याच्या शरीरावर नखांनी ओरबाडल्याच्या खुणा आणि कॉल डिेटेल्स रिपोर्ट (सीडीआर) ने शैलजा निलंगे यांच्या निर्घृण हत्येचा गुंता सुटला. सायबर शाखेसह फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. यामुळे घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसलेल्या या हत्याप्रकरणाचा उलगडा शक्य झाल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शुक्रवारी माध्यमांना दिली. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील भाडेकरूबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.दागिन्यांसह रोख लंपासघटनाक्रमानुसार, बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास निलंगे यांच्या घरी त्यांच्या नेहमीच्या दुधवाल्याने दुध दिले. त्यानंतर धीरज अरुण शिंदे (२३, कांडली, परतवाडा) हा शैलजा यांच्या घरात शिरला. त्यांना दूध तापवून दिले. त्यानंतर त्याने शैलजा यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने प्रथम शैलजा यांना गादीवर ढकलवून दिले. त्या प्रतिकार करत असल्याने त्याने त्यांना तोंडावर बुक्का मारला. त्यात शैलजा यांचा एक दात पडला. त्या जोरदार प्रतिकार करत असल्याने आरोपी धीरजने प्रथम त्यांचा चेहरा उशीने दाबला. त्यानंंतर एका स्कार्फने त्यांचा गळा आवळला. हा सर्व घटनाक्रम रात्री ११.३० च्या सुमारास घडला. त्याचवेळी बाहेर कुणाला याप्रकरणाची खबर लागू नये, यासाठी आरोपीने निलंगे यांच्या घरातील टीव्हीचा आवाज वाढविला. त्यानंतर त्याने शैलजा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, कानातील टॉप्स, १० हजार रुपये रोकड घेतली. हत्या केल्यानंतर तो स्वत:च्या खोलीत परतला. काम तमाम केल्याची माहिती प्रेयसीला दिली. पहाटे ५ ते ५.२० च्या सुमारास त्याने एसबीआयचे एटीएम गाठले. मात्र, तेथून त्याला रक्कम काढता आली नाही. त्यानंतर दस्तुरनगर परिसरातील आयसीआयसीआय एटीएममधून त्याने चारदा प्रत्येकी १० हजार रुपये काढले. ५० हजार रुपये, सोन्याचे दागिने आणि मृतक शैलजा यांचा मोबाइल त्याने त्याच्या विवाहित प्रेयसीकडे सुपूर्द केला.पायदान बनवून विकण्याचा व्यवसाय करणारा धीरज दोनच महिन्यांपूर्वी शैलजा निलंगे यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहायला आला असला तरी करून निलंगे यांचा विश्वास संपादन करून एटीएमचा पासवर्ड अवगत केला होता. निलंगे यांच्या बँक खात्यात भरपूर पैसा असल्याची माहिती त्याला होती. त्यामुळे अतिशय थंड डोक्याने त्याने या हत्येला अंजाम दिल्याची माहिती सीपींनी दिली.मृताची बहीण चौकशीच्या घेऱ्यातधीरज शिंदे याला जलारामनगर येथील शैलजा निलंगे यांच्या घराविषयी त्यांच्या बहिणीनेच माहिती दिली. आरोपी हा सुस्वभावी असल्याचे सांगितले गेल्याने शैलजा यांनी भाडेकरू म्हणून ठेवले. त्यामुळे शैलजा यांच्या बहिणीचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. हत्येच्या एका दिवसापूर्वी शैलजा यांच्या खात्याची बँकेत चौकशी झाली होती. हा मुद्दा तपासात घेतल्याची माहिती सीपींनी दिली.प्रेयसीही ताब्यातहत्या केल्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीला मोबाईलद्वारे संपर्क साधला. निलंगे यांच्या घरातून पळविलेला ऐवजासह ४० हजार रुपये त्याने तिच्याच स्वाधीन केले. एका मुलाची आई असलेली आरोपी धीरजची ही प्रेयसी फरशी स्टॉप परिसरातील रहिवासी असून, तिचे माहेर कांडली आहे. लग्नानंतर आरोपी धीरजशी जवळीक आल्याने व आर्थिक ओढाताण होत असल्याने धीरजने शैलजा यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघेही पूर्वाश्रमीचे कांडली येथील रहिवासी आहेत.एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज, सीडीआरने गुंता सोडविण्यास यश आले. सायबरसह सर्वच यंत्रणेने शक्ती पणाला लावली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकाकी जेष्ठ नागरिकांनी त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला द्यावी.- दत्तात्रय मंडलिक, आयुक्त
असा सुटला गुंताशैलजा निलंगे यांची थंड डोक्याने हत्या केल्यानंतर धीरज पहाटे त्याच्या खोलीत परतला. निलंगे यांची हत्या व त्यापूर्वी कथितरीत्या झालेला घटनाक्रम त्यानेच पोलिसांसमोर कथन केला.त्यावेळी त्याच्या अंगावर नखाने ओरबडण्याच्या खुणा पोलिसांपासून लपू शकल्या नाहीत. निलंगे यांच्या घरात धीरज हा एकमेव भाडेकरू असल्याने पोलिसांनी त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. पोलिसांनी बुधवारीच एसबीआय गाठून निलंगे यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्या खात्यातून चारदा एटीएमद्वारे रक्कम विड्रॉल झाल्याचे निष्पन्न झाले. हा धागा हाती येताच पोलिसांनी दस्तुरनगर व परिसरातील एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. दस्तुरनगर-फरशीस्टॉप भागातील एका एटीएममधील फुटेजची पाहणी करत असताना, त्यांना आरोपी धीरज त्यात आढळून आला. ओळख लपविण्यासाठी त्याने त्याचा चेहरा स्कार्फने झाकला होता. त्याआधारे त्याला अटक करण्यात आली. त्याने कबुली दिल्याने तो मारेकरी असण्यावर शिक्कामोर्तब झाले. एटीएमच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तरुण-तरुणी सोबतीने जात असल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. जलारामनगर स्थित निलंगे यांच्या हत्येनंतर आरोपी धीरज याने माहिती देण्यासाठी घेतलेला पुढाकार व त्याच्या अंगवार नखाने ओरबडल्याच्या खुणा त्याच्यापर्यंत पोहचविण्यास पूरक ठरल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.