अमरावती : कोविड साथीमुळे रमजान ईद घरी राहून व गर्दी टाळून साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अपर जिल्हा दंडाधिकारी नितीन व्यवहारे यांनी गुरुवारी परिपत्रकही जारी केले आहे. त्यात नमूद आहे की, १३ एप्रिलपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला आहे. चंद्रदर्शनानुसार १३ किंवा १४ मे रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड साथीची अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रूग्णसंख्येचा विचार करता विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह, तसेच इफ्तारसाठी मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात साजरे करावे. नमाज पठणासाठी मशिदीत, तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी स्टॉल लावू नयेत, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. सर्वांनी याअनुषंगाने जारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.