अमरावती : मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिनाभर उपवास ठेवून ईश्वराची प्रार्थना करतात. हातून कळत -नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित्त करीत असलेले कैदीदेखील यात मागे राहिले नाहीत, याची प्रचिती येथील मध्यवर्ती कारागृहात बुधवारी आली. निमित्त होते, रमजान ईदचे. ईदनिमित्त मुस्लिम १५० कैदी एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक नमाज पठण करून मानवतेच्या शांतीसाठी प्रार्थना केली.रमजान महिना प्रारंभ होताच सुमारे १५० कैद्यांनी रोजा ठेवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार कारागृह प्रशासनाने मुस्लिम धर्मीयांच्या रीतिरिवाजानुसार उपवासाठी लागणारे साहित्य, जेवणाची व्यवस्था केली होती. पहाटे उपवास ठेवण्यापासून तर सायंकाळी उपवास सोडण्यासाठीचे दैनंदिन नियोजन करण्यात आले होते. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात मुस्लिम कैद्यांसाठी उपवासाचे साहित्य, फराळाची व्यवस्था करण्यात आली. हा उपक्रम महिनाभर नियमित चालला. बुधवारी रमजान ईदचे औचित्य साधून कारागृह प्रशासनाने मुस्लिम कैद्यांसाठी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून दिली होती. या कैद्यांना सामूहिक नमाज पठणासाठी मौलवी काबीज नवाउद्दीन यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार मुस्लिम बंदीजनांनी नमाज पठण केली. ईश्वराकडे सर्वांच्या भल्यासाठी साकडे घातले. एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. कारागृहात कॅन्टीनमध्ये विशेष मेन्यू चिकन आणि पनीर भाजीचे वाटप करण्यात आले. दरम्यान, शिरखुर्म्याचे वाटपदेखील झाले. हा उपक्रम कारागृह नियमांच्या अधीन राहून करण्यात आल्याची पुष्टी अधीक्षक रमेश कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कारागृहात मुस्लिम कैद्यांकडून ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:28 AM
मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिनाभर उपवास ठेवून ईश्वराची प्रार्थना करतात. हातून कळत -नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित्त करीत असलेले कैदीदेखील यात मागे राहिले नाहीत, याची प्रचिती येथील मध्यवर्ती कारागृहात बुधवारी आली.
ठळक मुद्देनमाजचे सामूहिक पठण : एकमेकांना दिल्या शुभेच्छा