आॅनलाईन लोकमतअमरावती : कठोरा मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून उद्घाटन होण्यास अवकाश असला तरी त्या परिसरातील नव्या रस्त्याला आताच तडे गेले आहेत.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करण्याचा आव आणणाऱ्या जे.पी.एन्टरप्रायझेस या कंपनीच्या कठोरा मार्गावरील कामाचा दर्जा बघितल्यास या कंपनीला मुख्य अभियंत्यांनी आतापर्यंत ब्लॅकलिस्टेड का केले नाही, असा सवाल निर्माण होतो.या मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे क्युरिंग नियमानुसार झालेले नाही. त्यात वापरले जाणारे साहित्य सुमार आहे. रस्त्यात वाळूचे प्रमाण असावे तितके ते नाही. सिमेंटच्या ग्रेडची तपासणी त्रयस्थ संस्थेने केल्यास त्यातील गोमही बाहेर येईल. करोडो रुपयांची ही कामे केवळ पैसे ओरबाडून नेण्यासाठी केले जात असावे असे चित्र आहे. विशेष असे की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे आणि प्रभारी मुख्य अभियंता विवेक साळवे हे त्या कंपनीच्या दावणीला बांधल्यागत मूग गिळून गप्प आहेत. ज्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवावे, तेच या लुटीला बळ देत असतील तर सार्वजनिक बांधकाम खाते कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.क्युरिंगसाठी मातीचा वापररस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचेही काम याच कंपनीकडे आहे. नाल्यांच्या स्लॅबवर चक्क काळ्या मातीचे आळे केल्याचे कुणीही पाहू शकेल. सर्वदूर मातीचेच आळे आहेत. या आळ्यांपैकी पाणी मात्र बोटांवर मोजण्याइतक्या आळ्यांतच आहे. सिमेंट आणि मातीचे विळ्या भोपळ्याचे वैर सामान्य माणसालाही सांगता येणे शक्य असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विवेक साळवे यांना ते कसे ठाऊक नाही? करारनाम्यात मातीच्या आळ्यांसाठी अनुमती नसतानाही त्याला परवानगी कशी दिली गेली, असे सवाल उपस्थित करून ‘अधिकाºयांचे गोबरे गाल, नागरिकांचे हालच हाल’ असा नारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.‘- हे तर जुलमी शासन!’जणू जुलमी शासनाने अत्याचार करावे, असा नजारा कठोरा मार्गालगतच्या लोकांबाबत बघावयास मिळतो. 'विकास नको, रस्ता आवर' अशी तेथे स्थिती निर्माण झाली आहे. सहा-आठ महिन्यांपासून घरासमोरील मार्ग खोदून ठेवल्याने जाणे येणे बंद आहे. मेळघाटातील स्थितीप्रमाणे आजारी लोकांना उचलून न्यावे लागते. वाहन घरात नेता येत नाही. वाहनांची, त्यातील इंधनाची चोरी होत असल्याने रात्री जागरण करावे लागते. दुकानांमध्ये जाताच येत नसल्याने काही दुकानांना टाळे ठोकावे लागले. लोकांचा रोजगार हिरावून जेपी एन्टरप्रायझेसचे आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरणारा हा सिमेंट रस्त्याचा विकास नितीन गडकरींना अपेक्षित होता काय? हाच विकास देवेंद्र फडणवीसांना हवा होता काय, असा सवाल आता त्या परिसरातील मेटाकुटीस आलेले नागरिक विचारत आहेत.विवेक साळवे करणार काय कारवाई ?रस्त्याला तडे गेलेत. काम निकृष्ट असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सिमेंटवर मातीचे आळे केले आहेत. गुणवत्तेशी तडजोड करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासकीय निधीची लूट सुरू आहे. प्रभारी मुख्य अभियंता विवेक साळवे यांनी या मुद्याची गंभीर दखल घेऊन गुणवत्ता नियंत्रण चौकशीचे आदेश देणे अत्यावश्यक आहे. अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे त्यांनी स्वच्छ प्रतिमेच्या त्रयस्थ संस्थेचीही यात सोबत घेतल्यास कारवाईत पारदर्शकता असेल.
सिमेंट रस्त्याला तडे, क्युरिंगसाठी माती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:47 PM
कठोरा मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून उद्घाटन होण्यास अवकाश असला तरी त्या परिसरातील नव्या रस्त्याला आताच तडे गेले आहेत.
ठळक मुद्दे'जे.पी.'कडून पैशांची लूट : ‘अधिकाऱ्यांचे गोबरे गाल, नागरिकांचे हालच हाल’