वरूड : देशात पेट्रोल-डिझेलची ५० दिवसांत ३५ वेळा दरवाढ झाली. पेट्रोल १०७ रुपये, तर डिझेल ९५ रुपये प्रतिलिटरवर पोहचले तरीही दरवाढ सुरूच आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन केली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक घेऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्या. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक बळकट करून सर्व नागरिकांना रेशनद्वारे डाळी, खाद्य तेल, साखर, चहा, मसाले, अन्नधान्य प्रति १० किलो दरमहा मोफत देण्यात यावे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी. कोरोना प्रतिबंधक लस मोफत द्यावी. पुढील महिन्यासाठी देशातील असंघटित कष्टकऱ्यांना दरमहा ७ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य करावे, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. वरूड तालुका कौन्सिलचे सुखलाल कैथवास, कैलास बेलसरे, पंजाब काळे, सुरेंद्र काळे, मारोतराव धुर्वे, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर वाघमारे, रोशन वाघमारे, कायामुद्दीन पठाण आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.