अमरावती : देशात कोरोना संक्रमितांची संख्या घटत असताना अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आराेग्य विभागाच्या पथकाने रविवारी आरोग्य यंत्रणाची झाडाझडती घेतली. याच तीन जिल्ह्यांत कोरोना का वाढला, असा सवाल चमुने उपस्थित केला. तर, कोरोनाच्या उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका या पथकाने ठेवल्याची माहिती आहे.
दिल्ली येथील आरोग्य विभागाचे सुजित कुमार सिंग, संकेत कुलकर्णी व रणजित कौशिक या त्रिसदस्यीय चमुने अमरावती येथील सुपर स्पेशालिटी कोविड-१९ रुग्णालयात पाहणी करुन आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रमणले, अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार, रेवती साबळे, रविभूषण आदी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य पथकाच्या चमुने जिल्हानिहाय कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. अमरावती जिल्ह्यातील संक्रमित रुग्णांच्या मृत्यू दराबाबत चिंतासुद्धा त्यांनी व्यक्त केली. कोराेना संसर्ग राेखण्यासाठी उपाययोजनांवर बोट ठेवले. आता कठोर उपाययोजना करा, चाचण्यांची संख्या वाढवा, आयसोलेटेड रूग्णांवर करडी नजर ठेवा, गृह विलगीकरणातील संक्रमित रुग्णांवर पाळत ठेवा, कोरोना नियमावलींचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असा कानमंत्र स्थानिक आरोग्य यंत्रणांना दिल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्हा आरोग्य यंत्रणांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. आतापर्यंत केलेल्या उपाययोजना आणि रुग़्णसंख्येबाबतची माहिती चमुने जाणून घेतली.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती