अमरावती : ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या संसदीय समितीचा १७ ते २३ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. ही समिती ग्रामविकासाशी संबंधित असलेल्या १२ विषयांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणार आहे. ही समिती जिल्हा परिषद व जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख यांची संयुक्त बैठक सुद्धा घेणार आहे.
दरम्यान, योजनांच्या प्रगतीची माहिती घेतली जाणार असल्याने जिल्हा परिषद व अग्रणी बँकेचे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हा परिषदस्तरावर ग्रामविकास विभागाचे विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संसदीय समिती दिल्लीवरून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. याकरिता जिल्हा परिषद व अग्रणी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अभ्यास करणे, त्यांच्या प्रगतीची माहिती घेणे यासाठी समितीचा दौरा असून ही समिती विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या तीन जिल्ह्याचा दौरा करणार आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १७ ऑगस्टला अमरावती येथे आढावा घेणार आहे. समितीच्या आढाव्याच्या विषय सूचीवर १२ विषय आहे. या समितीचे प्रमुख बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव हे आहेत. याशिवाय एकूण २९ लोकसभेच्या व राज्यसभेच्या सदस्यांच्या या समितीत समावेश आहे. समितीच्या या अभ्यास दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या अग्रणी बँकेमध्ये प्रशासकीय तयारी सुरू असून विभागीय आयुक्त कार्यालयात या समितीची बैठक होणार आहे.
बॉक्स
या योजनांचा अभ्यास ?
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण नरेगा, दीनदयाळ उपाध्याय, अंत्योदय योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, सांसद आदर्श ग्राम, ग्रामीण विकासात सीएसआरची भूमिका, डिजिटल इंडिया, भूमिअभिलेख आधुनिकीकरण, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान आदी योजनांचा समितीकडून आढावा घेतला जाणार आहे.