अमरावती: जिल्ह्यात कोरोना संसर्गाने डोके वर काढले असताना येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोना हद्दपार झाल्याचे वास्तव
आहे. आजमितीला कारागृहात एकही कैदी कोरोना संक्रमित नाही. गृह विभागाच्या कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी म्हणून कारागृह कोरोनामुक्त झाले आहे. १ मे २०२० ते जानेवारी २०२१ या दरम्यान कारागृहात १६५ कैदी संक्रमित आढळले असून, एक कर्मचारी, एक कैदी असे दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
गृह विभागाच्या कारागृह प्रशासनाने कैदी आणि कर्मचाऱ्यांना कोराेना संक्रमणाची लागण होऊ नये, यासाठी ३० एप्रिल २०२० पासून कठोर नियमावली लागू केली. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य आळीपाळीने बजवावे लागले. सलग १५ दिवस कर्तव्य बजावल्यानंतर पुढील १५ दिवस दुसरे अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावत होते, तसेच नवीन कैदी कारागृहात प्रवेश करताना अगोदर कोरोना चाचणी, तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन त्यानंतर जुने कारागृहात प्रवेश दिला जात होता. आजही हीच नियमावली सुरू आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, हॅण्डवॉश, सुरक्षित शारीरिक अंतर, गर्दी टाळणे आदी नियमांचे तंतोतंत पालन करण्यात कारागृह प्रशासन यशस्वी ठरले आहे. त्यामुळे हल्ली १०८४ कैदी संख्या असताना एकही संक्रमित कैदी आढळून न येणे ही जमेची बाजू मानली जात आहे. यात महिला कैदी २१ तर, १०६३ पुरुष कैदी बंदिस्त असल्याची माहिती आहे.
००००००००००००००००००
नियमित आरोग्य तपासणी
कारागृहातील दवाखान्यात बंदीजनांची नियमित तपासणी करण्यात येते. आतमध्ये स्वतंत्र दवाखाना असून, येथेच बंदीजनांवर प्राथमिक उपचार केला जातो. एप्रिलपासून आतापर्यंत कैद्यांची नियमित तपासणी केली जात आहे. सर्दी, खोकला, तापाचे लक्षण आढळून येताच पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात कैद्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक कैद्याच्या आरोग्याची काळजी घेण्यात आल्यामुळे कारागृहात कोरोना फार काळ टिकला नाही. कारागृहात प्रत्येक कैद्याला मास्क अनिवार्य करण्यात आल्याची माहिती कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी एफ. आय. थोरात यांनी दिली.
---------------
या उपाययोजना ठरल्यात लाभदायक
- नवीन कैद्यांची कोरोना चाचणी बंधनकारक
- नवीन बंदीजनांना १४ दिवस क्वारंटाईन
- नातेवाइकांची कैद्यांसोबत भेट नाही
- बंदीजनांना बाहेरील कपडे, स्वेटर घेण्यास मनाई
- कैद्यांच्या दिनचर्यादरम्यान गर्दी न होऊ देण्याचे नियोजन
- बराकीतही शारीरिक अंतराचे पालन
-