अमरावती : मध्यवर्ती कारागृहातील ६५ वर्षीय कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मुकुंदा केशव वाघ (६५) असे मृताचे नाव आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदी मुकुंदा वाघ यांच्याविरुद्ध वडाळा येथील टीटी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्यावर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. २०१५ मध्ये शिक्षाप्राप्त मुकुंदा वाघ याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर २२ जानेवारी २०१८ रोजी कैदी मुकुंदा वाघ याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणले गेले. पाच ते सहा दिवसांपासून याची प्रकृती बिघडली होती. कारागृहातील डॉक्टरांनी त्याच्यावर औषधोपचार सुरू केले. मात्र, मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने इर्विन रुग्णालयात आणतानाच त्याचा मृत्यू झाला. कारागृह पोलिसांनी मुकुंदा वाघ याच्या मृतदेहाला इर्विन रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवले. बुधवारी सकाळी त्याच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ पाठविण्यात आला. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल.
मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 7:45 PM