मेळघाटात दौरा; विविध विकासकामांची पाहणी
अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी चिखलदरा तालुक्यातील मोथा, मडकी, जैतादेही, एकझिरा या गावांना भेटी देऊन तेथील कोरोना परिस्थिती व विविध कामांची पाहणी केली. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, उपअभियंता दीपेन्द्र कोराटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिन्नारे, तालुका वैद्यकीय अधिकारी व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पंडा यांनी सुरुवातीला मोथा व मडकी या गावांना भेटी देऊन गावस्तरीय कोरोना दक्षता समितीसोबत संवाद साधला. यावेळी मडकी येथे अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्याबद्दल ग्रामवासी यांचे कौतुक केले. लवकरच सर्व गावांतील पात्र व्यक्तींचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यानंतर चिखलदरा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून संक्रमित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणाची सूचना दिल्यात. तसेच जैतादेही पॅटर्नच्या कामांना भेट दिली. चिखलदरा तालुक्यात जैतादेही पॅटर्ननुसार यावर्षी तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा, अंगणवाडीचा विकास करण्याच्या सूचना सीईओंनी दिल्यात. चिखलदरा तालुक्यातील मी समृद्ध तर गाव समृद्ध योजनेंतर्गत झालेल्या नियोजनाचा आढावा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लखपती करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रोजगार हमी योजनेला केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करण्याची अपेक्षा सीईओंनी व्यक्त केली.
बॉक्स
कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी
चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त एकझिरा गावाला मुख्यकार्यकारी, अधिकारी यांनी भेट देऊन विहिरींच्या कामांची पाहणी केली. यावेळी पाणीटंचाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची विनंती सीईओंना केली.