अमरावती : राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीचा पीआरसीचा ६ ते ८ ऑक्टोबर असे तीन दिवसांचा दौरा निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयात प्रशासकीय कामांना वेग आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्यांत पंडा यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. याबाबत आवश्यक माहिती अद्यावत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पंचायतराज समिती जिल्ह्यात दाखल होणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेणे सुरू केले आहे. याशिवाय ही समिती जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा व विकासकामांची पाहणी करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. समितीच्या दौऱ्यात कुठल्याही माहितीची उणीव भासू नये आणि कामासंदर्भातील आवश्यक माहिती तातडीने अपडेट ठेवण्याबाबत सूचना सीईओंनी दिल्या आहेत. यासाठी सध्या जिल्हा परिषदेत विविध यंत्रणांच्या प्रमुखांची बैठका दररोज घेतल्या जात आहेत. या संदर्भात आवश्यक असलेली माहिती वरच्यावर घेऊन त्यात त्रुटी असल्यास सूचना देऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे.
सीईओंनी घेतला बीडीओंचा क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:12 AM