अमरावती : कृषीविषयक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतेवेळी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. सोबतच प्रवेशप्रक्रिया लागू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासंदर्भात २ फेब्रुवारीला शासननिर्णय पारित करण्यात आला असून, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ही महत्त्वपूर्ण सुधारणा अंमलात येणार आहे.राज्यातील शासन मान्यताप्राप्त व कृषी विद्यापीठाशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठांतर्गत घटक महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी आणि प्रवेशप्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्टÑ विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) अधिनियम २०१५ मध्ये सीईटी आणि प्रवेशप्रक्रिया लागू करण्याची तरतूद आहे. तथापि, राज्यातील शासन मान्यताप्राप्त व कृषी विद्यापीठाशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांसह शासकीय कृषी महाविद्यालयांतील व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया व सामायिक प्रवेश परिक्षेबाबत स्पष्टता नव्हती. ती सुस्पष्टता यावी व एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने सीईटीचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिनियमाच्या कलम २३ अन्वये तयार करण्यात आलेल्या नियमातील तरतुदीनुसार आयुक्तांच्या स्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा राबविण्याचा निर्णय कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागाने घेतला आहे.
या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी सीईटी- बी.एस्सी. (आॅनर्स, कृषी, उद्यानविद्या, वनविद्या)- बी.एस्सी. आॅनर्स (सामाजिक विज्ञान)- बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान)- बी.टेक. (जैवतंत्रज्ञान) हे अभ्यासक्रम व्यावसायिक, शैक्षणिक अभ्यासक्रम घोषित करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे.