अमरावती विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती, २१ ते २३ ऑगस्टदरम्यान सीईटी ऑफलाईन होण्याचे संकेत
अमरावती : दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र, राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासावर आधारीत सीईटी परीक्षा ही १०० गुणांची असेल. साधारणत: ही परीक्षा २१ ते २३ ऑगस्ट २०२१ दरम्यान ऑफलाईन घेण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अमरावती विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी ‘लाेकमत’शी बोलताना दिली.
दहावी निकालाच्या पार्श्वभूमीवर गोसावी यांनी अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थी, पालकांनी संभ्रम बाळगू नये, असे आवाहन केले. सीईटी परीक्षा ही ऐच्छिक आहे. शहरी अथवा ग्रामीण भागात नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी सीईटी ही विद्यार्थ्यांसाठी पूरक ठरणारी आहे. यंदा दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीचे अंतर्गत मूल्यमापनांवर आधारीत जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीच्या निकालानंतर एकसमान परीक्षा घेण्यावर शालेय शिक्षण विभागाचा भर होता. त्याअनुषंगाने सीईटीचे नियोजन चालविले आहे. प्रथमत: सीईटी गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश मिळेल. त्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीचे प्रवेश निश्चित होतील, ही बाब शरद गोसावी यांनी स्पष्ट केली. विद्यार्थिसंख्येनुसार अकरावी प्रवेशाचे शासनस्तरावर नियोजन करणार असल्याचे गोसावी म्हणाले.
--------
शंभर गुणांची असेल सीईटी
दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी १०० गुणांची सीईटी परीक्षा द्यावी लागेल. यात राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आधारित इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांचा समावेश असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावली यात राहील. परीक्षा केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचे शिक्षण मंडळाची तयारी असल्याचे शरद गोसावी यांनी सांगितले.
-----------------
सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी
राज्य शिक्षण मंडळाच्या नियंत्रणात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी येत्या १९ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना संकेत स्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांसाठी नोंदणी करता येणार आहे.