कापूस कवडीमोल भावात : शेतकरी हताशसुनील देशपांडे अचलपूरसंत्रफळाचे गडगडले भाव, संत्रा कलमा विकल्या न गेल्याने शेतकऱ्यांना बसलेला फटका, संत्र्याला लागलेली गळती, बागांकडे न फिरकणारा व्यापारी, सोयाबीन आणि कापूस ही हातची गेलेली पिके, इतर पिकांची नापिकी त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आहे. प्रत्येक जण आपआपल्या परीने तो साजरा करतो. यावर्षीही तो साजरा केला गेला. बाजारपेठेत शेतकरी दिसलाच नाही. चाकरनाम्यांची मात्र खरेदीसाठी धूम झाल्याचे चित्र होते. यावर्षी सर्वच बाजूने शेतकरी, शेतमजूर यांचा आधार तुटल्याने दिपावलीचे हे प्रकाशपर्व काळोखात गेले. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची चिन्हे जुनमध्येच सुरू झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला वादळी पावसाने पिकांना झोपवून टाकले होते. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळायचा तो संत्रा कलमाच्या व्यवसायातून. संत्रा कलमांच्या व्यवहारावर फ्लॅट खरेदी, घर बांधणी, मुलांचे उच्च शिक्षण, विवाह याशिवाय पन्हेरीच्या पैशावर अन्य मोठे व्यवहार अर्थात उसनवारी क्षणात ठरायची याशिवाय पन्हेरीच्या भरवशावर रासायनिक खते व किटकनाशकांची उधारी व्हायची. सोबत किराणा व इतर देयके, कर्ज व या गोष्टी अवलंबून असायच्या. मात्र बाजारपेठ सुरू होताच संत्रा कलमांचे बाजारभाव जबरदस्त पडले. १५ रूपये प्रति कलम येणारा खर्च तर सोडा मातीमोल भावात विक्री करूनही ५० टक्के संत्रा कलमा शेतात उभ्या राहिल्या. यात कलम उत्पादक भुईसपाट झाला. पन्हेरी व्यवसायावर अवलंबून असणारा मजूरही यात कोंडीत सापडला. परिणामी या पन्हेरीवर अवलंबून असणारे सर्व व्यवहार ठप्प झाले. यावर्षी सोयाबीन, संत्रा, कापूस या पिकांनी दगा दिला. ज्वारीच्या कणसातही अळ्या पडल्या. सोयाबीन हातचे गेले. काहींनी उभ्या सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. त्यांचा लागलेला खर्चही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एक ते दोन पोती सोयाबीन झाले त्यास शासनाने योग्य भाव न देऊन रडविले. अचलपूर, चांदूरबाजार, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा, धारणी इत्यादी तालुक्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. कृषी विभागही शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सर्वच प्रकारचे खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने हिशेब जुळवायला शेतकऱ्याची दमछाक होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जातून मुक्त होण्याऐवजी पुन्हा कर्जबाजारी होत आहे. दुष्काळाची लाभलेली दृष्ट पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतोय. नापिकीला कंटाळून व हताश होवून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची किंमत शासन दरबारी एक लाख रूपये आहे.तिही मदत पात्र शेतकऱ्यांनाच मिळत आहे.निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. शेतीमालावर आधारित उद्योगाची गरज आहे. संत्रा बागायतदारांचीही हलाखीची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांविषयी पुळका दाखविणारे पुढारी आता कुठे गेले. गेल्या १० वर्षात पाच तालुक्यात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. समोर येऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा. - राजेश उभाडसामाजिक कार्यकर्ते.
चाकरमान्यांची मौज बळीराजाला शिक्षा
By admin | Published: November 23, 2015 12:22 AM