चांदूर रेल्वे शहरातील समस्या मांडल्या, आमदारांची अधिकाऱ्यांशी चर्चा
चांदूर रेल्वे : शहरातील विविध समस्यांसंदर्भात भाजप नगरसेवकांनी स्थानिक नगर परिषदेसमोर साखळी उपोषणाला बुधवारपासून सुरुवात केली. आमदार प्रताप अडसड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते नगरसेवक व नगर परिषद अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या वृक्षारोपणामध्ये शासननिधीचा नगर परिषदेकडून गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृक्षारोपण नियमाप्रमाणे झाले का, हे पाहण्यासाठी दोन-तीन झाडांभोवती खोदून दाखविण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केली असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे यात गौडबंगाल असून, याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. घंटागाडी खरेदी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. प्रभाग क्रमांक ३ मधील नवीन पाईप लाईनबाबत माहिती द्यावी. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा दुसऱ्या टप्प्यात निधी अजूनही अप्राप्त असल्यामुळे यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. सफाईच्या कामाच्या माहितीबाबत, रोजंदारी सफाई कामगारांच्या ईपीएफबाबत, नगरसेवकांनी मागितलेली माहिती वेळेवर न देता व खोटी माहिती देत असल्यामुळे व्यवस्थित माहिती द्यावी आदी मागण्यांचा या आंदोलनात समावेश आहे. भाजप नगरसेवक अजय हजारे, नगरसेविका सुरेखा तांडेकर, दीपाली मिसाळ, संजय पुरसाम हे साखळी उपोषणाला बसले आहेत. पहिल्याच दिवशी आमदार प्रताप अडसड यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संजय पुनसे, बंडू भुते, प्रसन्ना पाटील, सचिन जयस्वाल, विजय मिसाळ, विलास तांडेकर, बबनराव गावंडे, गुड्डू बजाज, उत्तमराव ठाकरे, डॉ. सुषमा खंडार, मनोज जयस्वाल, डॉ. वसंतराव खंडार आदींची उपस्थिती होती. यावर गुरुवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे.