प्रदीप भाकरे अमरावती : पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या दोन भामट्यांना घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. सोबतच एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव परिसरात घडली होती. अभिषेक उर्फ टोबो आनंदीलाल साहू (२२, रा. संतोषीनगर, अमरावती) व इमरान खान बिसमिल्ला खान (२५, रा. आझादनगर, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या चेनस्नॅचर्सची नावे आहेत.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथील रहिवासी प्रतिभा अरुण आठवले (४५) या गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पतीसह दुचाकीने रहाटगाव येथून जात होत्या. त्यावेळी रस्त्यावर दुचाकी घेऊन तीन तरुण उभे होते. त्यातील एकाने प्रतिभा आठवले यांना पत्ता विचारला. त्याचवेळी दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील ३१ हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरीने हिसकाविले. त्यानंतर तिनही लुटारू दुचाकीने तेथून पळून गेले. घटनेनंतर प्रतिभा आठवले यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकनेही घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासात या गुन्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ टोबो याचा हात असल्याचे समोर आल्यावर त्याला विलासनगर भागातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने हा गुन्हा इमरान खान व विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून केल्याची कबुली दिली. त्यानुसार इमरान खानला अटक करून विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
मंगळसूत्र, दुचाकी जप्तदोन आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र व दुचाकी असा एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, सतीश देशमुख, फिरोज खान, अलीमउद्दीन खतीब, नाझीमउद्दीन सय्यद, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, अमोल मनोहर, रोशन माहुरे, किशोर खेंगरे, सायबरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, निखिल माहुरे, अनिकेत वानखडे यांनी केली.