फोटो २८एएमपीएच०६, २८एएमपीएच०७
अमरावती : भारतीय जन संचार संस्थेच्या अमरावती स्थित क्षेत्रीय केंद्रातून चालविल्या जाणाऱ्या मराठी पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सत्र २०१९-२० मधून चैताली माहोरे, तर इंग्रजी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातून गौरी चंद्रा या विध्यार्थिनींनी प्रथम स्थान प्राप्त करीत प्रत्येकी पाच हजारांचा पुरस्कार पटकाविला.
आयआयएमसीच्या सक्षम प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० चा दीक्षांत समारंभ आयोजित केला जाणार नसल्याने पदविका प्रमाणपत्र आणि पुरस्कार स्पीड पोस्टद्वारे विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी पाठविले जाणार आहे.
भारतीय जनसंचार संस्थानतर्फे इंग्रजी, हिंदीसह उर्दू, मराठी, मल्याळम, ओडिया भाषेत पत्रकारितेचा पदविका तसेच रेडियो व टेलिव्हिजन आणि जाहिरात व जनसंपर्क विषयाचा स्वतंत्र एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येतो. अमरावती केंद्रात इंग्रजी आणि मराठी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
सर्व अभ्यासक्रमांमधून गुणानुक्रमे प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांना संस्थेतर्फे प्रत्येकी ५००० रुपये रोख पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अमरावती केंद्राचे संचालक अनिल सौमित्र यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. भविष्यात अमरावती केंद्र राज्यात सर्वोत्कृष्ट व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे केंद्र निर्माण होणार असून, पत्रकारिता व जनसंवाद क्षेत्रातील करिअरच्या संधी निर्माण करण्यास संस्थान प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विनय सोनुले, अनिल जाधव व संध्या झा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.