फोटो - फगवा ३१ एस
मेळघाटच्या फगव्यात कोरोनाची दहशत, ढोल-बासरीच्या तालावर आदिवासी नृत्य
नरेंद्र जावरे-चिखलदरा : जांगडी बेचो तुम्हारे जोरू का लेंहगा देवो हमारा फगवा रे... चकर मकर क्या देखो फगवा दे मुझको..... या आणि इतर आदिवासी पारंपरिक गीतांसह ढोल-बासरीच्या स्वरांनी मेळघाटातील आसमंत निनादला आहे. मंगळवारपासून मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील आदिवासी युवक-युवतींची टोळकी होळीची गीते गात फगव्यासाठी रस्त्यावर उतरली आहेत. पाच दिवस हा रंगपंचमीचा महोत्सव साजरा होणार आहे. यंदा मात्र पहिल्यांदा या त्यांच्या सर्वांत मोठ्या सणावर कोरोनाची दहशत स्पष्टपणे दिसून आली आहे.
मेळघाटातील आदिवासी कोरकू आपला सर्वांत मोठा होळी हा सण साजरा संपूर्ण आठवडाभर साजरा करणार आहेत. वर्षभरापासून या सणाची तयारी कुटुंबातील लहानापासून मोठ्यापर्यंत करतात आणि त्याचे नियोजन त्या पद्धतीने आजही मेळघाटात केले जाते, नाच-गाणे, गाठीभेटी, रंगाची उधळण आणि मोहाच्या सिड्डूसह मटण (जुलू), पुरी, चावलीचे जेवण मेळघाटातील ढाण्याढाण्यात सुरू झाले आहे. आदिवासींचे वेगळेच विश्व आहे. ते संस्कृतीचे जतन पिढ्यानपिढ्या करीत आले आहेत.
होळी या सणासाठी अंगमेहनतीची कामे करण्यासाठी स्थलांतरित झालेले आदिवासी तीन दिवसांपूर्वीच मेळघाटात परतले. गुरुवारी मोठी होळी पेटवल्यानंतर शुक्रवारपासून सुरू झालेल्या फगव्याचा जल्लोष सातपुडा पर्वतरांगांत वसलेल्या आदिवासी खेड्यांत सुरू झाला. आदिवासी ढोल-बासरीच्या तालावर नाचगाणे करीत, पारंपरिक वेशभूषेत सणाचा आनंद साजरा करीत आहेत.
-------------
कोरोनाची दहशत, आर्थिक चणचण
वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. अशातच आदिवासी मजुरांना कामाच्या शोधात नेहमीप्रमाणे मेळघाटबाहेर पडावे लागले, तर काहींनी मग्रारोहयो अंतर्गत कामावर हजेरी लावली. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक मिळकत न झाल्याने कोरोना सावटातच आदिवासींनी यंदाची होळी साजरी केली. रस्त्यावर मोजकेच टोळके दिसून आले.
बॉक्स
‘जागंडी’ला अडवून फगवा वसुली
मेळघाटातील आदिवासी शहरी माणसाला ‘जांगडी’ म्हणतात. गावातील बाजार किंवा मुख्य मार्गावर रस्त्यावर मानवी साखळी तयार करून या शहरी जांगडीला अडवून त्याच्याकडून फगवा मागण्याची पद्धत आजही कायम आहे. पाच दिवस फगवा मागितल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून गावशिवारावर बकऱ्याचे जेवण सिड्डूच्या सुगंधात दरवळणार आहे. रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावूनही प्रत्येक वाहन अडवून त्यांच्याकडून आनंदाने हा फगवा मागितला जात आहे