१६ जानेवारीला टीईटी : जिल्ह्यात २२ परीक्षा केंद्र सज्जअमरावती : डीटीएडधारक विद्यार्थ्यांची ससेहोलपट आणि नोकरीसाठी भटकंती होत आहे. पुन्हा एकदा नऊ हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षक होण्याच्या ईर्ष्येने ‘टीईटी’ला सामोरे जाणार आहेत. जिल्ह्यातील २२ केंद्रावरून १६ जानेवारीला ९,५३९ विद्यार्थी प्राथमिक शिक्षकपदी नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या टीईटीला (शिक्षक पात्रता परीक्षा) प्रविष्ठ झाले आहेत. टीईटीच्या दोन विषयांच्या पेपरसाठी परीक्षा केंद्राचे नियोजन महसूल विभागाने केले आहे. गतवर्षी टीईटीचा निकाल अवघा दीड ते दोन टक्के लागला असताना टीईटी देणाऱ्यांचा टक्का घटेल, अशी शक्यता असतानाही बेभरवशाच्या प्राथमिक शिक्षक या नोकरीसाठी तब्बल नऊ हजार विद्यार्थी टीईटीतून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार आहेत. चुकीचे नियोजन आणि घसरलेल्या दर्जामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांना उतरती कळा लागली. पटसंख्या घसरल्याने शिक्षकांसह मुख्याध्यापकही अतिरिक्त ठरले. त्यांच्या समायोजनेचा प्रश्न निर्माण झाला. मागील १० वर्षांत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. राज्यात तूर्तास डी.एड. करून बेरोजगारीची झळ सोसणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. मात्र त्यानंतरही नोकरी मिळेल, जागा निघतील, अशा भाबड्या आशेपोटी राज्यातील हजारो डीटीएडधारक पात्रता परीक्षा असलेल्या टीईटीला सामोरे जात आहेत. राज्यात २२ हजार शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर टीईटी होवून राज्य शासन बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याही विपरित परिस्थितीत १६ जानेवारीला होणाऱ्या टीईटीला जिल्ह्यातून ९,५३९ विद्यार्थी सामोरे जात आहेत. (प्रतिनिधी)
नऊ हजार विद्यार्थ्यांपुढे शिक्षक बनण्याचे आव्हान
By admin | Published: December 26, 2015 12:25 AM