महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक : वेळापत्रक जाहीर अमरावती : सन २०१७ च्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. यानुसार १५ दिवसांत नव्या स्वरूपात प्रभागांची हद्द निश्चित करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. बहुतेकवेळा प्रारूप प्रभाग स्वत:च अंतिम होत असल्याने सप्टेंबरमध्येच बहुसदस्यीय प्रभागांची हद्द इच्छुकांना समजू शकणार आहे. राज्यातील नऊ महापालिकांची मुदत मार्च-एप्रिल २०१७ मध्ये संपत असल्याने पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निवडणुकांसाठी प्रभागरचनेचा कार्यक्रम आयोगाने शनिवारी जाहीर केला. त्यानुसार सात सप्टेंबरपर्यंत महापालिकेला प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव निश्चित करायचा आहे. त्यातही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरिता आरक्षित प्रभागांसह हा प्रस्ताव तयार करण्यासाठी पालिकेकडे केवळ १५ दिवस आहेत. संभाव्य प्रभागाच्या रचनेचा प्रस्ताव बनविण्यासाठी पालिका यंत्रणेची कसरत होणार आहे. ठरावीक कालमर्यादेत हे काम पूर्ण करायचे असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची मदतही घेण्यात येणार आहे. मनपासाठी सन २०११ लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर बहुसदस्यीय पद्धतीने प्रभागरचना होईल. तूर्तास महापालिकेचे सभागृह ८७ सदस्यांचे आहे. त्यामुळे २१ प्रभाग चार सदस्यीय व १ प्रभाग ३ सदस्यांचा राहू शकतो. ही प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत चालणार असून आचारसंहिता डिसेंबर-जानेवारीमध्ये लागणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अवघा महिनाच मिळेल, असे संकेत आहेत. प्रभागरचना, आरक्षण सोडतीचे वेळापत्रक प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करणे -७ सप्टेंबर, प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव (एससीएसटी, आरक्षित प्रभागासह तपासणी करुन निवडणूक आयोगाकडे १२ सप्टेंबरपर्यंत पाठविणे, सोडतीसाठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता), जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे- ४ आॅक्टोबर, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी सोडत-७ आॅक्टोबर, प्रारुप प्रभागरचनेची (सोडतीनंतर) अधिसूचना १० आॅक्टोबर, हरकती व सूचना १० ते २५ आॅक्टोबर, यावर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी ४ नोव्हेंबर, सुनावणी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिफारशी नमुद करुन प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सादर करणे, १० नोव्हेंबर, हरकती व सूचनांचा विचार करुन निर्णय देणे- २२ नोव्हेंबरपर्यंत, अंतिम अधिसूचना २५ नोव्हेंबर.
अवघ्या पंधरवड्यात हद्द निश्चितीचे आव्हान
By admin | Published: August 23, 2016 11:58 PM