लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्याचसोबत गारपीट होऊन संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले. या झाडांना बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी मृग व येणाऱ्या आंबिया बहराचे व्यवस्थापन करणेदेखील महत्त्वाचे आहे.गारपीटमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात व यापासून नुकसान संभवते. यात निरनिराळ्या बुरशींचे संक्रमण होते. यामध्ये फायटोप्थेरा, कोलेटोत्रीकम, डिप्लोडीया, आॅल्टरनारिया यासारख्या बुरशी खरचटलेल्या जखमांतून शिरकाव करतात व रोगांचा प्रसार वाढतो. त्याबरोबर झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटतात व काही गळतात. त्यामुळे झाडांची सूर्यप्रकाशात अन्नद्रव तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे झाडावरील मृगबहराच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. आंबिया बहराची फुले निघाल्यास गारपिटीने गळतात किंवा आंबिया बहर फुटण्यास उशीर होतो. पाहिजे तसा ताण बसत नाही. त्या जखमा भरून निघणे व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होणे करिता खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. गारपीटमुळे मोडलेल्या फांद्या आरीच्या सह्याने कापाव्यात व कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.झाडाची साल फाटली असल्यास १ टक्के पोटाशियम परमग्नेट द्रावणाने (१०० ग्रॅम १० लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी व जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास वाफ्यात सायमोक्स्रील + मंकोजेब (मिश्र घटक) किंवा मेटरअक्सिल + मंकोजेब या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणीचे द्रावण (८ ते १० लिटर प्रति झाड) या प्रमाणात टाकावे. झाडावर कार्बेन्डाझीम (१ ग्रॅम लिटर पाणी) किंवा कॉपर ओक्सिक्लोराईड (३ ग्रॅम/लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना + ६०० ग्रॅम मोरचूद + १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करावा.सद्यस्थितीत आंबिया, मृगबहार नियोजनसद्याच्या परिस्थितीत दिवसा व रात्री तापमानात होणारी घट ही आंबिया बहारातील संत्रा, मोसंबी व लिंबू झाडांना ताण बसण्याकरिता योग्य असली तरी सतत असणारे ढगाळ वातावरण अधून-मधून झालेला पाऊस व गारपीट ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीमुळे संत्रा, मोसंबी व लिंबू झाडाचा ताण सुटून कमी तापमानामुळे फुलोर ऐवजी नवती येण्याचीच जास्त शक्यता असते. याकरिता झाडे कायम ताणावर राहणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत आंबिया बहाराला पोषक हवामान परिस्थिती नाही. यासाठी सायकोसील (क्लोरामिक्व्ट क्लोराईड) या संजीवकाची २ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्वरित फवारणी करावी.असे करा झाडाचे व्यवस्थापनगारपीटग्रस्त झाडाला एक किलो अमोनियम सल्फेट प्रतिझाड याप्रमाणे द्यावे. त्याचबरोबर शक्य असल्यास चीलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रवाची (झिंक + कॅलशियम + फेरस सल्फेट मिश्र घटक) ०.२ टक्के प्रमाणात फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्सियम नायट्रेट १ टक्का (१ किलो) + जिब्रेलिक अॅसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पानांची संख्यावाढ होईल, असे कृषी विद्यापीठाच्या अ. भा. संशोधन प्रकल्पाचे दिनेश पैठनकर व योगेश इंगळे यांनी सांगितले.
गारपीटने संत्र्यावर बुरशीजन्य रोगाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:00 AM
गारपीटमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात व यापासून नुकसान संभवते. यात निरनिराळ्या बुरशींचे संक्रमण होते. यामध्ये फायटोप्थेरा, कोलेटोत्रीकम, डिप्लोडीया, आॅल्टरनारिया यासारख्या बुरशी खरचटलेल्या जखमांतून शिरकाव करतात व रोगांचा प्रसार वाढतो. त्याबरोबर झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटतात व काही गळतात.
ठळक मुद्देसंडे अँकर । कृषी शास्त्रज्ञांची माहिती : मृग, आंबिया बहराचे व्यवस्थापन महत्त्वाचे