-----------------------
५४८ व्यक्तींना रविवारी डिस्चार्ज
अमरावती : उपचारादरम्यान बरे वाटल्याने रविवारी ५४८ जणांना घरी सोडण्यात आले. त्यांना आता एक आठवडा गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४०,४०० वर पोहोचली आहे. ही टक्केवारी ८९ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
-----------------------
रुग्ण दुपटीचा कालावधी ३२ दिवसांवर
अमरावती : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२ दिवसांवर आल्याची धक्कादायक माहिती आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये हाच ‘डबलिंग रेट’ फक्त १५ दिवसांवर आला होता. आता कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने कालावधी ३२ दिवसांवर पोहोचल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.
------------------------
रविवारी ५,२५७ चाचण्यांचा उच्चांक
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात येत होत्या. आता विद्यापीठ लॅबची क्षमता वाढविण्यात आल्यामुळे तीन हजारांपर्यंत चाचण्या होत आहे. याशिवाय ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेनच्या चाचण्या वाढल्याने सद्यस्थितीत होत असलेल्या चाचण्या उच्चांकी असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
------------------------
रविवारी ५,२२७ संशयित रुग्णांची तपासणी
अमरावती : जिल्ह्यात रविवारी ५,२२७ संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यत २,९२,५८७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. २,८५,४३३ नमुने तपासणी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी ४५,३९५ नमुने पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
-------------------------
पावसाने गहू, हरभरा पिकाचे नुकसान
अमरावती : जिल्ह्यात काही भागात सुरू असलेला पाऊस व गारपीटमुळे सवंगणी केलेला हरभरा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय संत्राचीही फळगळ झालेली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून मदत निधी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
-----------------------
प्रभागात धुरळणी, फवारणी केव्हा?
अमरावती : महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागात कित्येक महिन्यांपासून धुरळणी व फवारणी झालेली नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्यामुळे स्वच्छता कंत्राटदार धुरळणी व फवारणी करण्याचे टाळत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
------------------------
दंडात्मक कारवाया पुन्हा माघारल्या
अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारा पथके नेमून महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. आता संसर्ग कमी झाल्यानंतर या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे अनेक भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना फाटा दिल्या जात आहे.
---------------------
राजकमल चौक फलकमुक्त केव्हा?
अमरावती : शहर सौदर्यीकरणाचे दृष्टीने राजकमल चौक फलकमुक्त करण्यात आल्याचे महापौर चेतन गावंडे यांनी चार महिन्यापूर्वीजाहीर केले होते. मात्र, महापालिका प्रशासनाला या निर्देशाचा विसर पडल्याने व कोणतीही कारवाई केलीजात नसल्यानेच पुन्हा हा चौक विनापरवानगी जाहिरातींनी बुजला आहे.