चांदूर बाजार : तालुक्यातील बेसखेडा येथील पशुपालकाच्या २०० बकऱ्या अज्ञात आजाराने दगावल्या. त्या बकऱ्या कशामुळे मरण पावल्या, याचा शवविच्छेदनापश्चात वैद्यकीय अहवाल महिनाभरापासून मिळाला नसल्याने संतापलेले पशुपालक रवि पाटील यांनी सोमवारी चांदूर बाजार येथील प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी चेतन सोळंके यांना त्यांच्या दालनात कोंडले. या घटनेने पशुवैद्यकीय विभागात खळबळ माजली आहे.
सूत्रांनुसार, रवि पाटील यांच्याकडील बकरी शुक्रवारी सकाळी मरण पावली. त्याची माहिती त्यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयाला दिली. मात्र, ते उपस्थित नसल्याने या घटनेची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाकरिता पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिला. शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, नमुने सोमवारी दुपारपर्यंत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले नव्हते. पशुपालक रवि पाटील यांना संबंधित अधिकाऱ्याकडून याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी सोळंके यांना त्यांच्या कार्यालयातच बंद केले.
सदर प्रकारची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, सुधीर जिरापुरे व प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी चांदूर बाजार गाठून तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याचा ढिसाळ कारभार असल्याचे मान्य केले. यात सुधारणा करण्याचे व मृत बकरीबाबत प्रयोगशाळा अहवाल देण्याचे आश्वासन देऊन रवि पाटील यांची समजूत घालण्यात आली. त्यानंतर डांबून ठेवलेल्या प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोडण्यात आले.
----------------------
चांदूर बाजारातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील दगावलेल्या जनावरांच्या नोंदी तसेच नमुन्याच्या अहवालाचे कोणतीच जतन केलेले नसल्याचे आढळले. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.
- विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
----------------------------
गतवर्षी माझ्याकडील काही बकऱ्या दगावल्या. यावर्षी पुन्हा त्याचे सत्र सुरू झाले. शवविच्छेदनाचा प्रयोगशाळा अहवाल या कालावधीत मिळालेला नाही. माझ्यासह अनेक पशुपालकांची ही तक्रार आहे.
- रवि पाटील, पशुपालक, बेसखेडा
----------------
पीएम रजिस्टर नाही
भोंगळ कारभारासाठी चर्चेत असलेल्या चांदूर बाजार तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांची हेळसांड सुरू आहे. तालुक्यात दगावलेल्या जनावरांची साधी नोंदसुद्धा या कार्यालयाकडे नाही तसेच मृत जनावरांचा शवविच्छेदनानंतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांची नोंदसुद्धा कार्यालयात उपलब्ध नाही. या प्रकारांमुळे पशुपालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
--------------
पशुपालक जनावरांचे जिवापाड संगोपन करीत असताना तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे जनावरांना योग्य उपचार मिळत नसल्याची आरोप केला जात आहे.