अमरावती : पुजा बांधून पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या एका मांत्रिकावर नागपूरच्या चौघांनी फावड्याने हल्ला चढविला. त्यात तो मांत्रिक क्षणातच यमसदनी पोहोचला. १४ ऑगस्ट रोजी रात्री शिवणी शिवारातील एका झोपडीत हा प्रकार घडला. रमेश मेश्राम (६३. रा. मिलिंदनगर, चांदूरररेल्वे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी, मृताचा मुलगा उज्वल याच्या तक्रारीवरून चांदुररेल्वे पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी आधी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. याप्रकरणी, कमलाकार बाबुराव मेश्राम (४५, बिडीपेठ, नागपूर), अकरम याकुब शहा (२३, रा. राऊतनगर, नागपूर), कमलाकर साहेबराव चरपे (४४, पवनसुतनगर, रमना मारोती, नागपूर), राजेश अभिमन्यू येसनपुरे (२८, रा. आर्शिवादनगर, नागपूर) व गाडीचालक मयुर प्रमोद मडगिलवार (२६, रा. न्यू बिडीपेठ, नागपूर) यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. चारही आरोपींनी खुनाची कबुली दिली. रमेश मेश्रामशी वादावादी झाल्यानंतर आपण त्याला फावड्याने मारल्याचे आरोपींनी सांगितले. १५ ऑगस्टला दुपारी मेश्राम हे शेतातील टिनाच्या खोलीत डोक्याला मार लागलेल्या स्थितीत दिसून आले होते.
आरोपी १४ ऑगस्ट रोजी १० च्या सुमारास मेश्राम याच्या शेतातील झोपडीत पोहोचले. त्याने पुजा मांडून दारू प्राशन केली. पुजा थांबवून मेश्रामला आरोपींना त्यादिवशी देखील परत पाठवायचे असल्याने त्याने दारूच्या नशेत आरोपींना शिविगाळ केली. आरोपींनी त्याला जाब विचारला. त्यांच्याच शाब्दिक वाद झाला. त्यात चारही आरोपींनी त्याच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने व काठीने प्रहार केले. मेश्रामला रक्तबंबाळ स्थितीत टाकून चारही आरोपींनी चालकासह तेथून नागपूरला पळ काढला. मेश्राम याने आरोपींकडून पैशाचा पाऊस पाडण्याकरीता सौदा करून मोठी रक्कम उकळली होती.