ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद
चांदूर रेल्वे : स्थानिक पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यांत १४० विद्यार्थ्यांनी येथे नोंदणी केली आहे.
‘पोलीस ठाणे तिथे अभ्यासिका’ या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या नेतृत्वात ठाणेदार मगन मेहते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातच एका इमारतीचे सुसज्ज अश्या अभ्यासिकेत रूपांतर केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हवी ती सुविधा त्यांनी या अभ्यासिकेत उपलब्ध करून दिली. खुद्द ठाणेदार मगन मेहते हे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. सकाळी ८ ते रात्री ८ अशा अवधीत एमपीएससीची तयारी करणारे उमेदवार येथे अभ्यास करीत असल्याचे समजले.
मुलींमध्ये येथे सुरक्षिततेची भावना असल्याचे मनीषा पवार, साक्षी शेरजे, ऋतुजा धामंदे यांनी सांगितले. तालुक्यातील शिरजगाव, भिलटेक, पळसखेड, सोनगाव येथूनही विद्यार्थी येथे अभ्यासाला येत असतात.
--------------
अभ्यासिकेला दररोज एकदा भेट देतो. ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवकांसाठी सुसज्ज जिमदेखील पोलीस ठाण्यामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
- मगन मेहते, ठाणेदार, चांदूर रेल्वे