लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये १५ हजार ते २५ हजार लोकसंख्येच्या गटात चांदूर रेल्वे नगर परिषदने अमरावती विभागातून तिसरा क्रमांक पटकावीत ५० लाख रुपये बक्षीस पटकावले.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ला राबविण्यास सुरुवात झाली होती. 'माझी वसुंधरा अभियान ४.०' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ४.० मधील लोकासंख्यानिहाय विजेत्या संस्थांची २७ सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली. यात अमरावती विभागातून चांदूर रेल्वे नगर परिषदेने तिसरा क्रमांक पटकावून ५० लाख रुपये पारितोषिक रक्कम प्राप्त केले. याकरिता मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, आरोग्य निरीक्षक राहुल इमले, लेखापाल संदीप माहुरे, रचना सहायक आशिष कुकळकर, कर निरीक्षक शारदा कावडे, संगणक अभियंता योगेश वासनिक, पाणीपुरवठा अभियंता परिमल देशमुख, लिपिक जितेंद्र कर्से, कर्मचारी विशाल सुरकार, राजेश शिर्के, अनंत वानखडे, पंकज इमले, मनीष कनोजे, संगीता इमले, संजय कर्से, शहर समन्वक पल्लवी जामोदकर व इतर कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले.
"शहर स्वच्छता, पर्यावरणपूरक उपायोजना, वृक्षारोपण आणि हरित शाश्वतेबाबत केलेल्या कामगिरीमुळे मिळालेले हे बक्षीस शहरातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. हा सन्मान भविष्यात आणखी प्रेरणादायी होईल .पर्यावरणासाठी सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करेल." - डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी
"स्वच्छ चांदूर, सुंदर चांदूर करण्यास व माझी वसुंधरा अभियानमध्ये नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व त्यांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश संपादन झाले. असेच नागरिकांनी सहकार्य करावे. हे पारितोषिक नगरपरिषदेसह संपूर्ण शहरवासीयांचे आहे." - राहुल इमले, आरोग्य निरीक्षक