जिल्ह्यातील १५७ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यात चांदूरबाजार तालुक्यात ३, मोर्शी तालुक्यात १, अमरावती तालुक्यात १ आणि शहरात १ असे सहा डेंग्यूचे रुग्ण चार महिन्यात आढळून आले. त्या भागात आजार वाढू नये, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी स्पॉट व्हिजिट देऊन त्या-त्या परिसरात टेमिफॉस अक्टिव्हिटी राबविण्यास सांगितले. स्वच्छता राखण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली. काही घरांलगत गोठा असल्याने शेणासह सांडपाण्याच्या नाल्या बुजल्यामुळे साठलेल्या पाण्यावर डासांची निर्मिती होऊन काही नागरिकांना याचा प्रादुर्भाव झाला होता. तो वाढीस लागू नये, यासाठी ग्रामसेवकांना पत्र देऊन स्वच्छ करून घेण्याविषयी पत्र देण्यास नागरिकांना सुचविले.
बॉक्स
एकापेक्षा अधिक रुग्ण निघाल्यास धूर फवारणी
एडीस इजिप्ती या मादी डासांपासून डेंग्यू आणि चिकनगुनिया आजार होतो. त्याचा प्रसार एकापासून दुसऱ्या व्यक्तीला डासांनी डंख मारल्यास होतो. ज्या भागात हजार लोकसंख्येत एकापेक्षा अधिक डेंग्यूचे किंवा चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्यास धूर फवारणी आरोग्य विभागामार्फत केली जाते. त्यासाठी ४ लिटर डिझेल, १ लिटर पेट्रोल आणि २०० ग्रॅम पायराथ्रम औषधांचे मिश्रण करून परिसरात फवारणी केली जाते. यात डिझेल व पेट्रोलची व्यवस्था ग्रामसेवकांद्वारा केली जाते, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी बी.एस. वावरे यांनी दिली.
-
१५ जूनला सर्व आशांना गप्पी मासे देणार
जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्रत्येक पीएचसी केंद्र, उपकेंद्र मिळून ३६८ गप्पी मासे पैदास केंद्र शहरी व नागरी भागात ८६ केंद्र आहेत. यातून १५ जून रोजी सर्व आशांना गप्पी मासे वितरित करून ते एकाच दिवशी १ जुलै महिन्यात सर्व डबक्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोट
इतर विभागाच्या समन्वयाने सर्व उपाययोजना राबवून प्रभावी अंमलबजावणी करून कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न राहील. यासाठी आरोग्य संचालकांच्या सूचना आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत.
- डॉ. शरद जोगी,
जिल्हा हिवताप अधिकारी