फोटो पी ०३ ट्रॅक्टर
अमरावती : पोलिसांच्या आपली चोरी लक्षात येऊ नये, म्हणून चोराने चोरून आणलेल्या ट्रॉलीचा रंग बदलविला. मात्र, त्या चोराचा तो कावा फसला व तो पोलिसांच्या तावडीत सापडला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला मंगळवारी अटक केली.
लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २६ ऑगस्ट रोजी अज्ञात लोकांनी एक ट्रॅक्टर ट्रॉली रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा त्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ३१ ऑगस्ट रोजी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक शे. तस्लीम यांच्या पथकास चोरीस गेलेला ट्रॅक्टर मंगरूळ चव्हाळा येथे राहणाऱ्या सलीम अ.मजीद याने त्याचे साथीदारासह चोरल्याची माहिती मिळाली. ट्रॅक्टर ओळखू न येण्यासाठी ट्रॉलीचा रंग बदलवून ती भागचंद नगर, धामणगाव रेल्वे येथे खुल्या जागेत उभी करण्यात आली होती. माहितीवरून मंगरूळ चव्हाळा येथून सलीम अ. मजीद याला ताब्यात घेण्यात आले. त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली व आरोपीला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन, अप्पर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, लोणीचे ठाणेदार कुलवंत यांचे मार्गदर्शनात एएसआय मुलचंद भांबुरकर, चंद्रशेखर खंडारे, बळवंत दाभणे, मंगेश लकडे, उमेश वाकपांजर, सायबर सेलचे रितेश वानखडे, सरिता चौधरी, नितीन कळमकर यांनी कारवाई केली.