नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : नाफेडच्या चणा खरेदी केंद्रावर माल मोजणीसाठी ग्रेडरकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्यानंतर शिवसेनेने जोरदार राडा घातला. शिवसेनेचे नेते प्रकाश मारोटकर यांनी ग्रेडरच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी सहायक निबंधकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाफेड केंद्रावर चणा खरेदीची अंतिम मुदत ११ जून आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची चणा विक्रीसाठी लगबग सुरू आहे. यादरम्यान मोजणीसाठी आणलेली मालाची प्रत चांगली नसल्याचे सांगून पैशाची मागणी केली जात असल्याची ओरड ऐकायला मिळाली. शेतकऱ्यांच्या या तक्रारीनंतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते केंद्रावर दाखल झाले.
वातावरण तापल्याने सहायक निबंधक व खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष तसेच संचालक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकऱ्यांचा चणा मोजून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याची सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण सोळंके, प्रगेश बनसोड, सुरेश तांदूळकर, शुभम जयस्वाल, कुणाल शेंडे, चेतन अजमिरे, रोशन तांबडे, शरद रुमणे, मधुकर पुनसे, सागर जाधव यांच्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते.
चणा चांगल्या प्रतीचा असतानासुद्धा माल मोजणीकरिता ग्रेडरने पैशाची मागणी केली.
- रोहित जयस्वाल, शेतकरी
निकृष्ट दर्जाचा माल परत केल्याच्या मुद्यावर वाद घालण्यात आला आणि मारहाण करण्यात आली.
- रवी मानकर, ग्रेडर
नाफेडअंतर्गत चणा मोजून घेण्याकरिता ग्रेडर पैशांची मागणी करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. खरेदी केंद्रावर त्याची शहानिशा करून ग्रेडरला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
- प्रकाश मारोटकर, जिल्हाप्रमुख, युवा सेना ठाकरे गट