अमरावती : राजकारणात राजकीय स्वचरित्र असावे लागते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारण हे चारित्र्यहीन झाले आहे. विचारांशी बांधिलकी राहिलेली नाही. सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत असून, खरेदीदारदेखील उभे आहेत. परंतु सत्य हे कधीही लपत नाही. अशा राजकीय वातावरणातही उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे असल्याचे मत खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.
उद्धव ठाकरे हे ९ आणि १० जुलै असे दोनदिवसीय विदर्भ दौरा करीत आहेत. या दौऱ्यामध्ये ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अमरावतीमध्येही १० जुलैला संवाद सभा होणार आहे. त्याअनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी अमरावतीमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सभा स्थळाची पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना सूचना दिल्या.
तसेच यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार सावंत म्हणाले, काळ इतका बदलला की माणसांनी माणुसकी विसरली आहे. ज्याने घडविले त्या शिल्पकारालाच विसरले, त्या शिल्पकारालाच घेऊन पळायला लागली आहेत. सध्याच्या राजकारणातून माणुसकी हरवली असून, सत्व आणि तत्त्व उरलेले नाही. कालपर्यंत आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आत तेच त्या हिंदुत्वाच काय झालं हे विचार करताहेत. ज्यांच्यामुळे ते उद्धव साहेबांना सोडून गेले, आज तेच त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यामुळे मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.