अमरावती - पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणा-या 'त्या'डेंन्टीस पतीविरुद्ध सायबर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने सायबर पोलिसांनी तपास करून निरीक्षण नोंदविल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, ५ एप्रिल २०१८ रोजी पीडित पत्नीने कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानंतर तपास सायबर सेलकडे सोपविला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपी पतीला जामीन दिला. काही दिवसांनंतर आरोपी पतीने एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने पीडित महिलेच्या जुन्या न्यायालयीन प्रकरणे लक्षात घेता आरोपी पतीने पत्नीची फसवणूक केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. त्यासंबंधाने गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, त्यासंबंधित चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने सायबर पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवसांच्या सखोल चौकशीअंती आरोपी पतीविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला.
काय आहे प्रकरण?तक्रारकर्ता पत्नी व आरोपी पती हे दोघेही दंत तज्ज्ञ लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीला लैंगिक संबंधाविषयी आकर्षण नसल्याचे पत्नीच्या लक्षात आले. पतीची वागणूक बदलली कशी, तो शारीरिक व मानसिक त्रास का देत आहे, याविषयी पत्नीला संशय बळावल्याने तिने पतीचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावेळी पतीचे एका पुरुषासोबत लैंगिक संबंध असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. एकेदिवशी तिने पती दवाखान्यात नसताना छोटासा छुपा कॅमेरा बसविला. त्या कॅमेºयात पती एका पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचे तिला दिसले. पतीच्या या कृत्याचा १८ वर्षांनंतर पदार्फाश झाला. तिने छुप्या कॅमेºयात झालेले चित्रिकरण पुरावा म्हणून पोलीसासमक्ष ठेवला आणि पतीविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंविच्या कलम ३७७, ४०६, ४९८(अ) अन्वये गुन्हा नोंदविला.
त्या डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. त्यानुसार तपास करून फसवणुकीच्या गुन्ह्याची कलम वाढविण्यात आली आहे. - कांचन पांडे, सहायक पोलीस निरीक्षक