अमरावती : प्रेमाने सांगतो, मुलीचे लग्न मुकाट्याने माझ्याशी लावून दे, अन्यथा तिला पळवून घेऊन जाईल, अशी गर्भित धमकी एका महिलेला देण्यात आली. २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीसांनी आरोपीरुद्ध पॉक्सो तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मायलेकीसोबत हा प्रसंग घडला. महिलेच्या शेजारी राहणाऱ्या कांबळे नामक व्यक्तीच्या घरी गायी म्हशींची ने - आण करताना आरोपी धीरज वानखडे (३०, अमरावती) हा महिलेला नेहमीच पाणी मागत होता. माणुसकी म्हणून ती त्याला प्यायला पाणी देत होती. १५ - १६ दिवसांपूर्वी महिलेची अल्पवयीन मुलगी पाणी देत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. छेड काढली. त्यावरून महिला त्याच्यावर चिडली. परत यायचे नाही, असे त्याला बजावले. मात्र, त्यावेळी तिने तक्रार दिली नाही.
मुलगी नखशिखांत हादरली
दरम्यान, आरोपी धीरजने शुक्रवारी सकाळी तक्रारकर्त्या महिलेला बोलावले. तथा तुझ्या मुलीचा हात माझ्यात हातात दे, तुझ्या मुलीवर मी प्रेम करतो. प्रेमाने तिचे लग्न माझ्याशी लावून दे, अन्यथा तिला पळवून घेऊन जाईल, अशी धमकी दिली. त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी नखशिखांत हादरली अन् आजारी पडली. तिला ताप आला त्यामुळे तिच्यावर उपचार केल्यानंतर महिलेने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी २२ जानेवारी रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास तक्रार नोंदविण्यात आली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी तक्रार नोंदविली.