अमरावती : जिल्ह्याच्या जरुड तालुक्यातील अवघ्या १६०० लोकवस्तीच्या घोराड या गावातील आई-वडिलांच्या मृत्युपश्चात अनाथ झालेल्या दीक्षा (१२) व खुशबू (८) या चिमुकलींचे घर बांधून तयार झाले आहे. लोकमतने ९ डिसेंबर २०१२ रोजी 'चिमुकल्या दीक्षा, खुशबूला हवी दातृत्वाची ऊब' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच समाजभान असलेल्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. ७०० चौरस फूट जागेतील या घरासाठी ४ लाख १० हजार रुपये खर्च आला आहे.
तहसीलचे वरिष्ठ लिपिक नरेंद्र कर्णासे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 'निवारा' ग्रुप तयार करून यातील सदस्यांनी या मुलींसाठी हक्काचे घर बांधून देण्याचा अट्टाहास पूर्णत्वास गेला. 'लोकमत'च्या बातमीची दखल घेत अमरावती येथील विलास बमनोटे आणि त्यांच्या पत्नी या दरमहा दीक्षा व खुशबू यांच्या उदरनिर्वाहासाठी पाच हजार रुपये पाठवितात. यादरम्यान या दोन्ही बहिणींना आठवी व सहावी या वर्गांकरिता वरूड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दीक्षा व खुशबू यांचे हक्काचे घर उभे राहावे, यासाठी निवारा ग्रुप सदस्य, अनेक समाजसेवी, घर उभारणारे मिस्त्री, मजूर यांनी मदत केली आहे.
आपल्याच आश्वासनांचा विसर
लोकमतमध्ये बातमी प्रकाशित होताच आ. देवेंद्र भुयार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या मुलींचा शैक्षणिक व लग्न होईपर्यंत खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते. खा. रामदास तडस यांनी आपल्या कार्यकत्यांना पाठवून मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर त्यांना आपल्या या मदतीच्या आश्वासनाचा विसर पडला आहे.